सावंतवाडी: इन्सुली येथे रानभाज्या महोत्सव उत्साहात; कोकणातील रानभाज्यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा संकल्प

शेअर करा

सावंतवाडी दि.२३ ऑगस्ट
कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात उगवणाऱ्या पारंपरिक रानभाज्यांना आता स्थानिक चुलीपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी नवी दिशा मिळाली आहे. इन्सुली येथे आयोजित रानभाज्या महोत्सवाला नागरिकांचा विक्रमी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाद्वारे महिला उद्योजकतेला चालना देण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे.
​या महोत्सवाचे उद्घाटन आणि सुरुवात भाजपचे युवा नेते श्री. विशाल प्रभाकर परब आणि युवा सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यांनी उपस्थित सर्व महिला स्पर्धकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
​उपक्रमाचा विस्तार महाराष्ट्रासह देशभरात करणार: वेदिका परब


​महोत्सावाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत सौ. वेदिका परब यांनी हा उपक्रम केवळ इन्सुलीपुरता मर्यादित न ठेवता सावंतवाडी तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात नेण्याचा संकल्प व्यक्त केला. ग्रामीण महिलांच्या पाककलेला आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, योग्य पॅकेजिंग आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास त्या स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
​रानभाज्यांमध्ये निर्यातीची मोठी क्षमता: विशाल परब


​भाजप युवा नेते विशाल परब यांनी सांगितले की, कोकणातील रानभाज्यांकडे केवळ खाद्यपदार्थ म्हणून न पाहता व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे. आज जगात आरोग्यदायी व नैसर्गिक पदार्थांना मोठी मागणी आहे. या भाज्यांचे योग्य संशोधन, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि डिजिटल मार्केटिंग झाल्यास या उत्पादनांना ‘ग्लोबल मार्केट’ सहज उपलब्ध होऊ शकते.
​सावंतवाडीत आठवडा बाजाराचे आश्वासन


​सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. महिलांनी बनवलेल्या रानभाज्या आणि घरगुती उत्पादनांना थेट ग्राहक मिळावेत, यासाठी सावंतवाडीत आठवडा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
​या कार्यक्रमाला सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष महेश सावंत, उपाध्यक्ष सचिन दळवी, माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, सदानंद कोरगावकर, महेंद्र पालव, साईनाथ राणे, मुख्याध्यापक शेवाळे आणि अजय कोठावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गौरवी पेडणेकर व शुभम धुरी यांनी केले, तर आभार डॉ. विजय दळवी यांनी मानले.

शेअर करा