सावंतवाडी : युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने पाटील कुटुंबियांना वृद्ध महिलेला दिला मदतीचा हात..

शेअर करा

संदेश सावंत, संजना सावंत यांच्या सामाजिक बांधिलकी जपत दातृत्वाची पुन्हा प्रचिती ;मुलाच्या वैद्यकीय खर्चाची घेतली जबाबदारी

सावंतवाडी,दि.२४ मे

इन्सुली पागावाडी येथील वृद्ध व निराधार महिला जनाबाई धोंडू पाटील यांच्या बिकट परिस्थितीची माहिती समजताच युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी तत्काळ त्यांच्या घरी भेट देत तीन महिने पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा हात दिला आहे.

जनाबाई पाटील या वृद्ध असून त्यांना कोणताही आधार नसल्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे. त्यातच त्यांचे घर पडण्याच्या अवस्थेत आहे. वयोमानामुळे मोलमजुरी करणेही त्यांना शक्य होत नाही. अंथरुणाला खिळलेल्या मुलाची देखभाल करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच असल्याने उपासमारीची वेळ त्यांच्या कुटुंबावर आली होती.
ही परिस्थिती समजल्यानंतर युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी तातडीने धाव घेत जनाबाई पाटील यांना तीन महिने पुरेल एवढे जीवनावश्यक साहित्य सुपूर्द केले. तसेच त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवत घर बांधणीसाठीही मदत करण्याचे आश्वासन संजना सावंत यांनी दिले आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्या राजश्री पवार, वैष्णवी सुतार आणि मिनल पवार उपस्थित होत्या.

दरम्यान, युवा संदेश प्रतिष्ठानचे संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि संजना सावंत यांच्या सामाजिक बांधिलकी व दातृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या काळात मदतीची आश्वासने देणारे अनेक असतात, मात्र,कोणताही स्वार्थ न ठेवता माणुसकी जपणारे सावंत दाम्पत्य यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. त्यांच्या या मदतकार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

शेअर करा