भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून अभियान; दर महिन्याला नागरिकांच्या समस्या थेट मंत्रालय स्तरावर सोडविण्याचा प्रयत्न
सावंतवाडी,दि.२४ ऑगस्ट
नागरिकांच्या तळागाळातील समस्या व अडचणी थेट मंत्रालय पातळीवरून दूर करण्याच्या उद्देशाने, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राज्यभरात सेवा अभियान राबवले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अभियानाचा शुभारंभ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उत्साहात झाला. या अभियानांतर्गत दर महिन्याला नागरिकांच्या विविध समस्या व अडचणींचा निपटारा केला जाणार आहे.
या उपक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशेष प्रतिनिधींची नियुक्ती केली असून, हे प्रतिनिधी जिल्हा व तालुकास्तरावर प्रत्यक्ष जाऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावत आहेत. सहाय्यसचिव संतोष साखरे यांच्याकडे या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे अभियान शासन, प्रशासन आणि भाजप संघटन यांच्यात जनतेचा समन्वय साधणारा एक महत्त्वपूर्ण दुवा ठरत असल्याचे आमदार प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले.
अनेक मान्यवरांची उपस्थिती
सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या सेवा अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, उपसभापती गौरव मुळीक,शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, सभापती मोहिनी मडगावकर, मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांकडून त्यांच्या विविध वैयक्तिक व सार्वजनिक समस्यांविषयीची निवेदने थेट स्वीकारण्यात आली. या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.