एक जण बचावला : वेंगुर्ले पोलिस ठाण्यात नोंद
वेंगुर्ले, दि.०२ जुन
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील समुद्रात आज मंगळवार २ जून रोजी सायंकाळी आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रणय ज्ञानेश्वर देवमाने वय २१ वर्ष राहणार गडहिंग्लज कोल्हापूर असे त्याचे नाव आहे. दरम्यान त्याच्या सोबत असलेला दुसरा पर्यटक पोहून पाण्याबाहेर आल्याने बचावला आहे. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नापता म्हणून नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गडहिंग्लज कोल्हापूर येथील सहा जण मित्र फिरण्यासाठी शिरोडा समुद्रकिनारी आले होते. समुद्र किनारी आल्यानंतर या सहा मित्रांपैकी दोघांना समुद्राच्या पाण्यात उतरून आंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे दोघे जण आंघोळीसाठी पाण्यात उतरले. बाकी चौघे जण किनाऱ्यावर मजा मस्ती करत होते. अचानक पाण्यात उतरलेल्या दोघांपैकी प्रणय देवमाने हा पाण्यात आंघोळ करता करता पुढे पुढे सरकला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. मात्र त्याच्या सोबत पाण्यात उतरलेला त्याचा मित्र पोहत पोहत पाण्याबाहेर आल्याने वाचला आहे.
शिरोडा समुद्रात पर्यटक बुडाल्याची माहिती मिळताच शिरोडा पोलीस दीपा मठकर व अन्य पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. बुडालेल्या पर्यटकांचा शोध सुरू केला. मात्र उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही.
दरम्यान आठ दिवसांपूर्वी शिरोडा केरवाडी येथील राजन सारंग होडी पलटी होऊन समुद्रात बुडाले होते. ही दुर्घघटना ताजी असतानाच आज एक पर्यटक शिरोडा येथील समुद्रात बुडाल्याचे समोर आले आहे.