१६ गावे वेंगुर्ले कार्यालयाला जोडल्याने ग्राहकांचे हाल; १७ वर्षे आमदार असूनही केसरकरांना प्रश्न सोडवता आला नाही: रूपेश राऊळ
सावंतवाडी, दि. ६ जून
सावंतवाडी तालुक्यातील सुमारे १६ गावे वीज वितरण कंपनीच्या वेंगुर्ले तालुक्यातील कार्यालयाशी जोडली गेल्याने स्थानिक वीज ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा घोळ गेल्या १७ वर्षांपासून आमदार असूनही दीपक केसरकर यांना सोडवता आलेला नाही. ठाकरे शिवसेनेने याविरोधात वारंवार आंदोलने केली, परंतु प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत हा प्रश्न सुटला नाही, तर मळेवाड जंक्शनवर प्रश्न सुटेपर्यंत ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.
या पत्रकार परिषदेला ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख राजू शेटकर, अशोक धुरी, सुनील गावडे, गुरुनाथ नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वीज खंडित झाल्यास ५० किमीची भुर्दंड:
पत्रकार परिषदेत बोलताना रूपेश राऊळ म्हणाले की, सावंतवाडी तालुक्यात पावसाचे आगमन झाले असून पाणीटंचाईचा प्रश्न काहीसा सुटेल, मात्र सध्या विजेचा मोठा लपंडाव सुरू आहे. तालुक्यातील नेमळे, आरोंदा, सातार्डा अशी १५ ते १६ गावे वेंगुर्ले कार्यालयाला जोडलेली आहेत. त्यामुळे या भागातील वीज खंडित झाल्यास ग्राहकांना तक्रार व कामासाठी तब्बल ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागतो. यापूर्वी आम्ही ‘भजन आंदोलन’ करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. १७ वर्षे आमदार म्हणून निवडून येऊनही हा वीज प्रश्न सुटू शकलेला नाही, ही खेदाची बाब आहे. आता येत्या ८ दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास मळेवाड येथे बेमुदत रास्ता रोको करण्यात येईल. तसेच आमदार प्रमोद जठार यांनीही विजेच्या प्रश्नावर जुन्या आठवणींना उजाळा देण्यापेक्षा ग्राहकांना अंधारात राहावे लागणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
पक्षप्रमुख योग्य निर्णय घेतील:
पक्षीय घडामोडींवर प्रश्न उपस्थित केला असता बोलताना राऊळ म्हणाले की, ज्या व्यक्तीला जाण आणि कृतज्ञता नाही, ती कोणाचीही होऊ शकत नाही. बाळ माने यांनी पक्षासोबत अवसानघातकीपणा आणि गद्दारी केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना मोठी संधी दिली होती. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेवर पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजू परब यांची भूमिका दुटप्पी:
माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊळ यांनी टोला लगावला की, परब यांनी आडाळी एमआयडीसी लोह खनिज उत्खनन बाबतीत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती, परंतु मी यावर अभ्यासपूर्ण भूमिका मांडली आहे. एमआयडीसी लोहखनिज उत्खननाबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत माहिती पोहोचली नसेल का? त्यामुळे संजू परब हे या प्रकरणात दुटप्पी भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होते. परब यांनी कुंडली काढण्यापेक्षा चिंतन मनन केले पाहिजे,असे त्यांनी सांगितले.
आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना राऊळ म्हणाले की, मतदारसंघातील जनतेने केसरकर यांना चार वेळा निवडून दिले आहे. येथील वीज वितरण कंपनीच्या समस्येची त्यांना खडान् खडा माहिती आहे. त्यामुळे त्यांनी केवळ निवेदने न देता थेट संबंधित मंत्र्यांकडे मुख्य भूमिका मांडून हा प्रश्न झटपट सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, मात्र ते तसे का करत नाहीत? असा सवाल त्यांनी केला.
पहिल्याच पावसात विकासाचे धिंडवडे:
सावंतवाडी शहरात वनविभागाच्या कार्यालयासमोर पहिल्याच पावसात ढोपरभर पाणी साचले आहे. यावरून शहरातील विकासाचा फुगा फुटला असून नगरपरिषदेच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. जनतेच्या अशा प्रत्येक समस्येवर आणि अन्यायकारक प्रश्नांवर ठाकरे शिवसेना सतत कार्यरत राहील, असे राऊळ यांनी स्पष्ट केले.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे जनतेची चेष्टा:
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या रखडलेल्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त करताना राऊळ म्हणाले की, हे हॉस्पिटल अद्याप सुरू न होणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी हे रुग्णालय वेत्ये या ठिकाणी उभारण्यासाठी प्रामाणिक पुढाकार घेतला होता, मात्र आमदार दीपक केसरकर यांनी त्यात पायात पाय घालून खो घातला. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावावर केवळ जनतेची चेष्टा सुरू असून, ही चेष्टा थांबवून लोकप्रतिनिधींनी आतातरी जनतेसाठी प्रत्यक्ष काम करावे, असे आवाहन राऊळ यांनी शेवटी केले.