सिंधुदुर्ग : राज्यात २०४ आश्रमशाळांमधील ७९ हजार ६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी

शेअर करा

आदिवासी विकास विभागाचा ‘अॅनिमिया निवारण कार्यक्रम’; ‘सीएसीआर’सोबत सामंजस्य करार

 सिंधुदुर्ग,दि.२५ ऑगस्ट 
राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांमधील अॅनिमिया (रक्तक्षय) समस्या दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘अॅनिमिया निवारण कार्यक्रम’ युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत अवघ्या दीड महिन्यात राज्यातील २०४ शाळांमधील ७९ हजार ६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.
 या तपासणीमध्ये १४९ शासकीय आश्रमशाळांमधील ५५ हजार ८६८, ४८ अनुदानित आश्रमशाळांमधील २२ हजार ४२० तसेच ६ एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील १ हजार ३३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३७ हजार ९१९ विद्यार्थी आणि ४१ हजार ७०५ विद्यार्थिनी आहेत.   अॅनिमियामुक्तीसाठी आदिवासी विकास विभागाने ‘सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स’ (सीएसीआर) या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन पातळी तपासण्यात येत आहे.

नाशिक विभागात सर्वाधिक ४१,४६९ विद्यार्थ्यांची तपासणी
नाशिक विभागातील १०४ शाळांमधील ४१ हजार ४६९ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ८० शासकीय आश्रमशाळांमधील ३१ हजार ३९३, २१ अनुदानित आश्रमशाळांमधील ९ हजार २२७ आणि ३ एकलव्य शाळांमधील ८४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 ठाणे विभागातील ८१ शाळांमधील ३३ हजार ४२६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५९ शासकीय आश्रमशाळांमधील २२ हजार ५४, १९ अनुदानित आश्रमशाळांमधील १० हजार ८८५ आणि ३ एकलव्य शाळांमधील ४८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 अमरावती आणि नागपूर विभागात अनुक्रमे २ हजार ८९८ आणि १ हजार ८३१ विद्यार्थ्यांच्या एचबी पातळी मोजण्यात आली आहे. अमरावती विभागात ८ शासकीय आश्रमशाळांमधील १ हजार ८८५ विद्यार्थी आणि ३ अनुदानित आश्रमशाळेच्या 1 हजार १३ विद्यार्थ्यांची, तर नागपूर विभागात २ शासकीय आश्रमशाळांमधील ५३६ विद्यार्थी आणि ५ अनुदानित आश्रमशाळांमधील १ हजार २९५ विद्यार्थ्यांच्या हिमोग्लोबिन तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली.

एचबीचे प्रमाण कमी आढळलेल्या विद्यार्थ्यांना पूरक आहार
तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आले आहे, अशा विद्यार्थ्यांना आवश्यक पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राखणे, अॅनिमियाचे प्रमाण कमी करणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

शेअर करा