दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित;महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सिंधुदुर्ग,दि.२९ ऑक्टोंबर
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यांमधील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील शासन आदेश सहकार विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँक व जिल्ह्यातील 27विकास संस्था , 20पर्यटन , बेरोजगार अशा ड वर्गातील संस्था, 19 पतसंस्था , कंज्युमर अशा क वर्गातील मिळून 65 निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संबंधित सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळाली आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार अपर निबंधक तथा सहसचिव संतोष अरुण पाटील यांनी परिपत्रक काढले आहेत.
राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ निवारण व मदतकार्याशी संबंधित उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे शासनाने आदेशात नमूद केले आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध विभागांमार्फत प्रशासकीय यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीच्या कर्जवसुलीस स्थगिती, शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांना प्राधान्य, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासारख्या उपाययोजनांचा विचार शासनाकडून करण्यात आला आहे.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ क मधील तरतुदींनुसार दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य शासनाला आहेत. या तरतुदीचा आधार घेत दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यांतील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका सध्या ज्या टप्प्यावर आहेत, त्या टप्प्यापासून पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बॉक्स –
सिंधुदुर्ग बॅंकेची निवडणूक प्रक्रिया थांबली –
त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 65 संस्थांच्या निवडणूका पुढे गेल्या आहेत. मुख्यत: सर्वाचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणूकीसाठी मतदारांची कच्ची यादी प्रसिध्द झालेली होती. त्यावर आक्षेप अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरु असतानाच शासनाचा स्थगिती आदेश आला आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेसाठी विविध गटातून इच्छूक असलेल्या विविध गटांचा हिरमोड झाला आहे. तसेच विविध गावांमधील विकास संस्था व विविध क व ड गटातील संस्थांमध्ये निवडणूकीची तयारी आता थांबणार आहे.