सिंधुदुर्ग : हर घर तिरंगा अभियानांतर्गत सिंधुदुर्गात विविध उपक्रमांचे आयोजन

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि.१२ ऑगस्ट

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार राज्यात दि. 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. ‘घरोघरी तिरंगा’ तसेच राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध देशभक्तीपर कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, कार्यालये, महामंडळे, शाळा, महाविद्यालये, नगरपालिका, जिल्हा परिषद व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षपूर्तीनिमित्त देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन, तिरंगा प्रदर्शन, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा बाईक रॅली, तिरंगा रॅली, तिरंग्यासोबत सेल्फी तसेच विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


‘वंदे मातरम्’ या गीताच्या 150 वर्षपूर्तीनिमित्त तिरंगा सेल्फी तसेच ‘वंदे मातरम्’ गीत असलेले व्हिडिओ तयार करून Harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये रांगोळी स्पर्धा व इतर देशभक्तीपर उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


या अभियानात शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग राहावा, यासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन, शासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अभियानादरम्यान कोणत्याही प्रकारच्या समस्या किंवा अडचणी उद्भवल्यास त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या स्तरावर संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या प्रमुखपदी सहायक संचालक संदिप बलखंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, अभियानासंदर्भातील अडचणी किंवा समस्यांसाठी नागरिक व संबंधित यंत्रणांनी 9763068083 या क्रमांकावर संपर्क साधावा


‘हर घर तिरंगा’ अभियानाबाबत अधिक माहिती, स्वयंसेवक नोंदणी, तिरंगा सेल्फी व व्हिडिओ अपलोड तसेच अन्य तपशीलासाठी https://harghartiranga.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. जिल्ह्यातील नागरिकांनी दि. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत आयोजित विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा