महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षपदी निवड; पंधरा वर्षांच्या स्नेहबंधांना उजाळा
तळेरे,दि.०३ ऑक्टोंबर
मराठी गझल, साहित्य, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तळेरे येथील अक्षरोत्सव परिवाराच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. साहित्यविश्वासाठी अभिमानास्पद मानल्या जाणाऱ्या या निवडीच्या पार्श्वभूमीवर अक्षरोत्सव परिवाराने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेनुसार भारतीय पोस्टकार्डावरील हस्तलिखित अभिनंदन पत्र देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
अक्षरोत्सव परिवार आणि प्रदीप निफाडकर यांचे नाते तब्बल पंधरा वर्षांपूर्वीपासूनचे आहे. त्यांच्या हस्ताक्षरातील संदेशपत्रे आजही अक्षरोत्सव संग्रहात जतन करून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांच्या या यशाचा आनंद अक्षरोत्सव परिवाराने आपुलकीने साजरा केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित संस्थेच्या कोषाध्यक्षपदी झालेली त्यांची निवड ही त्यांच्या साहित्यसेवा, संघटनकौशल्य आणि सांस्कृतिक कार्याची योग्य दखल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रदीप निफाडकर यांनी मराठी गझलेला नवे आशयविश्व दिले आहे. गझलला केवळ प्रेम आणि विरहाच्या चौकटीत न ठेवता वात्सल्य, अध्यात्म, कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक जाणीवांचा स्पर्श देत त्यांनी तिला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. ‘द हिंदू’ या राष्ट्रीय दैनिकाने त्यांचा उल्लेख “गझलसम्राट सुरेश भट यांची मशाल घेऊन पथदर्शक बनलेले गझलकार” असा केला आहे, तर ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी त्यांना “सुरेश भट यांचे अंतरंग शिष्य” म्हणून गौरविले आहे.
‘स्वप्नमेणा’, ‘गझलदीप’, ‘गझलधाम’, ‘एकमेव’, ‘वेगळे वाटसरू’, ‘तीर्थंकरांची गाणी’, ‘मै शायर’, ‘बस्तिक’ आणि ‘अर्थारती’ यांसारख्या पुस्तकांमधून त्यांनी साहित्यसंपदा समृद्ध केली आहे. गुरुवर्य सुरेश भट यांच्या अप्रकाशित कवितांचे संपादन, विविध भारतीय भाषांतील ‘आई’ विषयावरील कवितांचे संकलन तसेच मराठी गझलकारांच्या निवडक रचनांचा परिचय करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी उपसंपादक ते कार्यकारी संपादक असा प्रदीर्घ प्रवास करत सकाळ, लोकमत आणि देशदूत यांसारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांमध्ये प्रभावी कार्य केले आहे. आजही त्यांचे लेखन आणि विचारप्रधान सदरे वाचकांना नवी दिशा देत आहेत. उर्दू आणि मराठी साहित्य यांच्यातील सेतू म्हणूनही त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते.
गझलप्रेमींना जोडणारा ‘गझलदीप’
गझल अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदीप निफाडकर यांनी सादर केलेला ‘गझलदीप’ हा कार्यक्रम महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत हजारो वेळा सादर झाला आहे. साहित्यसंमेलने, मुशायरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक उपक्रमांमधून त्यांनी शब्दांची ज्योत सातत्याने तेवत ठेवली आहे.
अक्षरोत्सव : हस्ताक्षरातून जपलेला संवादाचा वारसा
‘अक्षरोत्सव’ हा जगभरातील मान्यवरांच्या हस्ताक्षरातील संदेशपत्रांचा अनोखा संग्रह आहे. या संग्रहातील प्रत्येक संदेशपत्र त्या व्यक्तीच्या विचारविश्वाचा, अनुभवांचा आणि जीवनदृष्टीचा दस्तऐवज ठरतो. विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून हा अमूल्य ठेवा समाजापर्यंत पोहोचविला जात असून, त्याला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
चौकट : २५ प्रदर्शनांमधून संग्रहाची व्यापक ओळख
अक्षरोत्सव संग्रहाची आतापर्यंत बेळगाव, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, चिपळूण, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळा, वाचनालये आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये २५ हून अधिक प्रदर्शने भरविण्यात आली आहेत. या प्रदर्शनांना मोठा प्रतिसाद लाभला असून अनेक मान्यवरांनी संग्रहाचे कौतुक केले आहे. सह्याद्री वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्रावरही या अनोख्या उपक्रमाच्या मुलाखती प्रसारित झाल्या आहेत.