Talere : तळेरेत महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराला प्रतिसाद

शेअर करा

४० महिला भगिनींनी घेतला लाभ

तळेरे,दि.१६ ऑक्टोंबर

श्री गांगेश्वर-खर्जादेवी नवरात्रोत्सव मंडळ, तळेरे यांच्या वतीने येथील श्री गांगेश्वर मंदिरात महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा ४० महिला भगिनींनी लाभ घेतला.

महिला शेतकऱ्यांना शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी करण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अद्याप ज्या महिलांनी शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी केलेली नाही, अशा महिलांनाही या सुविधेचा लाभ घेता यावा, यासाठी मंडळाच्या वतीने शिबिर आणखी एक दिवस वाढविण्यात आले.

या शिबिराच्या आयोजनासाठी कृषी सहाय्यक पाटील, तळेरे,उपसरपंच संदीप घाडी, निलेश सोरप, राजेश जाधव आणि पत्रकार अंकित घाडीगावकर यांचे सहकार्य लाभले.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक उपक्रमांसोबतच महिला शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न श्री गांगेश्वर-खर्जादेवी नवरात्रोत्सव मंडळाने केला आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

शेअर करा