तळेरे : कासार्डे माध्यमिक विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टीतून जंगी स्वागत…

शेअर करा

तळेरे,दि.१५ जून

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अतिशय उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पाचवी, आठवी तसेच इतर वर्गांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून तसेच वेलकम बँड बांधून आणि गुलाब पुष्प, पेन व चॉकलेट भेट देत तसेच पंचारतीने ओवाळून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक संचांचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा उत्साह आणि शिक्षकांची आत्मीयता यामुळे संपूर्ण विद्यालय परिसर उत्सवमय झाला होता. शाळेतील पहिलाच दिवस विद्यार्थ्यांच्या मनात कायमस्वरूपी आनंददायी आठवण म्हणून कोरला जावा, या उद्देशाने हा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी कासार्डे विकास मंडळ मुंबईचे प्रभारी अध्यक्ष दिपक पाताडे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, संस्था पदाधिकारी रविंद्र सि.पाताडे,माजी सैनिक रविंद्र ग.पाताडे,प्रभाकर नकाशे,दिपक गायकवाड,मंगेश पाळेकर,मुख्याध्यापिका बी.बी.बिसुरे तसेच पर्यवेक्षक एस. व्ही. राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका बी.बी. बिसुरे यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिस्त, परिश्रम आणि जिज्ञासू वृत्ती जोपासून शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी पदाधिकारी रविंद्र सि.पाताडे यांनी मुलांना नविन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.
दरम्यान कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सहसचिव आनंद कासार्डेकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
पर्यवेक्षक एस. व्ही. राणे आणि क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील विविध उपक्रमांची माहिती देत शिक्षणासोबतच क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पंचारतीने ओवाळून शुभेच्छा दिल्या. या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून शाळेविषयी आपुलकीची भावना अधिक दृढ झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. व्ही. राऊळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. व्ही. राणे यांनी केले.
ज्ञान, संस्कार आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाची परंपरा जपणाऱ्या कासार्डे माध्यमिक विद्यालयाने नवागतांच्या स्वागतासाठी राबविलेला हा उपक्रम शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी आणि अनुकरणीय उपक्रम ठरला आहे.
या कार्यक्रमाला पालक – ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा