डाक विभागाच्या योजना व सेवांचा अधिकाधिक प्रसार करावा : डाक अधीक्षक एन. टी. कुरळपकर
तळेरे, दि. १९ जून
भारतीय डाक, सिंधुदुर्ग विभागांतर्गत देवगड उपविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “टपाल विमा उत्कृष्ट कामगिरी सत्कार समारंभ” तळेरे येथील एम. डी. देसाई सांस्कृतिक सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या समारंभास टपाल खात्यातील कर्मचारी तसेच ग्रामीण डाक सेवक व विमा प्रतिनिधी असे एकूण १२० कर्मचारी उपस्थित होते. टपाल विमा (PLI/RPLI) क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ९४ कर्मचाऱ्यांचा डाक अधीक्षक श्री. एन. टी. कुरळपकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डाक अधीक्षक श्री. कुरळपकर उपस्थित होते. तसेच देवगड उपविभागाचे डाक निरीक्षक श्रीराम वायाळ यांची उपस्थिती लाभली.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. कुरळपकर यांनी डाक विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजना, टपाल विमा योजना तसेच पार्सल सेवेचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि उत्साहाने कार्य करावे, असे आवाहन केले. बदलत्या काळानुसार ग्राहकाभिमुख सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या समर्पित सेवाभावाचे कौतुक केले. हा सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी टपाल सहाय्यक रोहन सावंत, मेल ओव्हरशर विकास चौधरी व मयूर जुवाटकर तसेच तळेरे उपडाकघरातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडले.
विभागातील कर्मचारी व ग्रामीण डाक सेवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली. देवगड उपविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सत्कार सोहळा कर्मचाऱ्यांच्या कार्याला मिळालेली योग्य दखल ठरला असून उपस्थितांच्या स्मरणात राहणारा संस्मरणीय कार्यक्रम ठरला.