कवी विठ्ठल कदम यांच्या ‘फाळ’ कवितासंग्रहाचे सावंतवाडीत प्रकाशन
सावंतवाडी,दि.२३ ऑगस्ट
‘फाळ’ या कवी विठ्ठल कदम यांच्या कवितासंग्रहात आजचा शेती-संघर्ष तीव्रतेने मांडण्यात आला आहे. सामाजिक विद्रोहापासून शेतीच्या प्रश्नांपर्यंत झालेला त्यांच्या कवितेतील हा बदल स्वागतार्ह आहे. शेतीची समस्या ही न संपणारी गाथा आहे आणि हेच दुःख ‘फाळ’ या कवितासंग्रहात व्यक्त झाले असल्याची भावना ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांनी येथे व्यक्त केली.
कवी विठ्ठल कदम लिखित आणि ग्लोबल बुक हाऊस प्रकाशित ‘फाळ ‘ या कवितासंग्रहाचे प्रकाशन श्रीराम वाचन मंदिरातर्फे सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात संध्या तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून समीक्षक आणि कवी प्राचार्य गोविंद काजरेकर, ज्येष्ठ कवयित्री प्रा. शरयू आसोलकर, समीक्षक प्रा. संजीवनी पाटील यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजक कादंबरीकार प्रवीण बांदेकर आणि श्रीराम वाचनालयाचे अध्यक्ष श्री. पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य गोविंद काजरेकर म्हणाले, “‘फाळ’ या कवितासंग्रहातील कवितांमधून कवी विठ्ठल कदम यांचा कवी म्हणून चेहरा अधिक ठळक होत गेला आहे. ही कविता आत्ताच्या काळाविषयी बोलते. जरी ही कविता शेतीविषयी असली, तरी त्यात विद्रोह आहे, हे आपण समजून घ्यायला हवे. कारण शेती आणि निसर्ग यांचे मनोरंजनात्मक चित्र ही कविता रंगवत नाही, तर शेतकऱ्यांची नेमकी काय परिस्थिती झाली आहे, याची शोकांतिका ही कविता मांडते आणि त्याबद्दल आवाज उठवू पाहते. हा आवाज समग्र समूहभावनेचा आहे, त्यामुळेच ही कविता शेतकऱ्यांच्या समग्र दुःखाला भिडते.”
प्रा. शरयू आसोलकर म्हणाल्या, “कर्जबाजारीपणा, नैसर्गिक संकटे, बाजारातील अस्थिरता आणि आत्महत्यांचे सत्र यामुळे उध्वस्त झालेल्या ग्रामीण जीवनाचे चित्रण ‘फाळ’मधील कवितांमधून ठळकपणे दिसून येते. मातीशी असलेले नाते, शेतात राबणाऱ्या हातांची कथा आणि तरीही जगण्याची जिद्द न सोडणाऱ्या शेतकऱ्याचा स्वाभिमान, या सर्व भावना कदम यांनी सोप्या पण भेदक भाषेत मांडल्या आहेत.”
प्रा. संजीवनी पाटील म्हणाल्या, “एका आदिम परंपरेने चालत आलेली शेती हा माणूस आणि माती यांच्यातील सहबंध आहे. अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गोष्टी मातीपासून मिळतात. ती पोषणकर्ती आहे. या पोषणकर्तीचे जतन करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याविषयीची भावना व्यक्त करणारी ही कविता आजच्या वर्तमानाला भिडते आणि त्यातील प्रश्न मांडते. मातीचा भूगोल बदलणारी व्यवस्था म्हणजेच शोषण. त्या शोषणाला ही कविता प्रतिकात्मक रूपाने विरोध करते. कष्टकरी शेतकऱ्याच्या जीवाच्या मोलाची जाणीव ठळक करून देणारी ही कविता आशावादी आहे. आज या कोरडवाहू माळरानावर विवेकशील विचारांचे बीज पेरू, जेणेकरून उद्याच्या पिढीसाठी तरी आपण काही देऊ शकू.”
यावेळी रमेश बोंद्रे आणि विठ्ठल कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कवयित्री नेहा कदम यांनी केले, तर प्रास्ताविक प्रवीण बांदेकर यांनी केले.