जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते लाभाचे वितरण
सिंधुदुर्ग,दि.०८ऑक्टोंबर
कोविड-१९ महामारीच्या कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार बालकांना राज्य शासनाने मंजूर केलेल्या प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या मुदतठेवीच्या मॅच्युरिटी रकमेचा लाभ बालकांनी वयाची २१ वर्षे पूर्ण केल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत संबंधित बालकांची नोंद घेऊन त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते चार बालकांना मुदतठेवीच्या मॅच्युरिटी रकमेचा लाभ प्रदान करण्यात आला. कोविड-१९ महामारीच्या काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या भवितव्याला आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने शासनाने घेतलेल्या या संवेदनशील निर्णयाचा लाभ संबंधित बालकांना मिळाला आहे.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बापू भिकू शिणगारे, जिल्हा परिविक्षा अधिकारी बी. जी. काटकर, विधी सल्लागार मृगाली नाईक, परिविक्षा अधिकारी महेश कळंत्रे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उदय मालवणकर, संरक्षण अधिकारी दीपिका सावंत, क्षेत्रीय कार्यकर्ता अपेक्षा दंताळ आदी उपस्थित होते.