वैभववाडी : विकास संस्थांनी आर्थिक उलाढाल वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत : मनीष दळवी

शेअर करा

वैभववाडी,दि.२९ ऑगस्ट
    जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या जीवावर उभी आहे. त्यामुळे विकास संस्थांना जिल्हा बँकेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. जिल्हा बँकेप्रमाणेच सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा आता विकास संस्थांमार्फत तात्काळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विकास संस्थांनी आपली आर्थिक उलाढाल वाढविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
   वैभववाडी तालुक्यातील १०० टक्के कर्जवसुली करणाऱ्या विकास संस्थांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. येथील वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृहात अध्यक्ष दळवी यांच्या १०० टक्के वसुली करणाऱ्या २५ पैकी २३ विकास संस्थांचा सत्कार करण्यात आला.
  यावेळी जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, रवींद्र भडगावकर, दिलीप रावराणे, बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील, नानिवडे विकास संस्थेच्या चेअरमन सीमा नानिवडेकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, क्षेत्रवसुली सरव्यवस्थापक दत्ताराम गावडे, संगणक प्रमुख हडकर, तालुका विकास अधिकारी प्रल्हाद कुडतरकर, वैभववाडी शाखा व्यवस्थापक सुरेश रावराणे तसेच विकास संस्थांचे चेअरमन, सचिव व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   अध्यक्ष दळवी पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना नियमित कर्जफेडीची सवय लावणे आवश्यक आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे. विकास संस्थांनी केवळ शेती कर्जापुरते मर्यादित न राहता विविध उद्योग-व्यवसायांसाठीही कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच शेतीपूरक उद्योग व व्यवसायांकडे वळावे, यासाठी विकास संस्थांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात सहकारी बाजार उभारण्याचा आमचा मानस असून, तालुका विक्री संघ व सहकारी संस्थांच्या माध्यमातून हा बाजार चालविला जाईल. विकास संस्थांनी आपल्या गावातील स्थानिक गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असेही दळवी यांनी सांगितले.
  प्रत्येक विकास संस्थेने किमान दीड कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल करण्याच्या दृष्टीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे. यापुढे जिल्हा बँकेप्रमाणेच सर्व प्रकारचे कर्ज विकास संस्थांमार्फत उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. यामुळे जिल्हा बँकेपेक्षा कमी व्याजदरात तसेच जलदगतीने कर्ज उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.
    वैभववाडी तालुक्यातील विकास संस्थांचे काम हे अतिशय चांगले असून कर्ज वसुलीत वैभववाडी जिल्ह्यात पुढे असल्याचे सांगत त्यांनी वैभववाडी तालुक्यातील संस्थाचे कौतुक केले.
     यावेळी संचालक रवींद्र भडगावकर, माजी संचालक दिगंबर पाटील, सीमा नानिवडेकर व गजानन गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी केले. तर आभार संचालक दिलीपराव रावराणे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील विविध विकास संस्थांचे चेअरमन, संचालक व सचिव उपस्थित होते.

शेअर करा