वेंगुर्ला,दि.३१ ऑगस्ट (प्रथमेश गुरव)
कृषी कल्याण गट व वेंगुर्ला हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शासनातर्फे मराठा व इतर मागास वर्ग समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध आर्थिक योजनांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम २५ ऑगस्ट राजी वेंगुर्ला हायस्कूल येथे घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शकांनी विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक गोविंद परब यांनी प्रामुख्याने मराठा प्रवर्ग व ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशांकरीता असणाऱ्या योजना सांगितल्या. वैयक्तिक कर्ज, व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा या योजनांबाबत मार्गदर्शन केले. वैयक्तिक कर्ज, व्याज परतावा योजनेसाठी कर्ज मर्यादा १५ लाख रूपये असून व्याजाचा दर जास्तीत जास्त १२ टक्के असेल. तर नियमित कर्ज रक्कमेचे हप्ते भरल्यास महामंडळामार्फत व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात लाभार्थ्याला देण्यात येत असल्याचे सांगितले.
शामराव पेजे कोकण इतर मागास वर्ग आर्थिक विकास मंडळाचे लेखापाल प्रकाश दळवी यांनी १५ लाख रूपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसह ओबीसी समाजासाठी लघू व छोट्या उद्योग-व्यवसायासाठी महामंडळाकडून देण्यात येणारी १ लाखांची ‘थेट कर्ज योजने’ची माहिती दिली.
नोकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असताना अशा शासकीय आर्थिक योजनांचा लाभ युवकांनी, महिलांनी घेऊन आपला व्यवसाय सुरू करावा आणि आर्थिक स्वावलंबी व्हावे असे आवाहन माजी मुख्याध्यापक एस.एस.काळे यांनी केले.
कृषी कल्याण गटाचे अध्यक्ष स्वप्निल रावळ यांनी प्रास्ताविकात स्वयंरोजगार, व्यवसाय निर्मिती, शेती पुरक व्यवसाय आणि शैक्षणिक कर्जांसाठी योजनांचे महत्त्व अधोरेखित करून बिन व्याजी कर्ज, व्याज परतावासारख्या विशेष सुविधांचे लाभ व्यावसायीकांनी घ्यावेत असे आवाहनही केले. जिल्ह्रात ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या ३० हजार असताना फक्त ७ हजार ५०० एवढेच विद्यार्थी शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत. अजूनही ७५ टक्के विद्यार्थी अनभिज्ञतेमुळे किंवा जनजागृती अभवी वंचित आहेत. यासाठी शासनाने शालेय स्तरावर या योजनांची व्यापक प्रसिद्धी करावी असेही श्री.रावळ यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थितांनी केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या कार्यक्रमाला कृषी कल्याण गटाचे उपाध्यक्ष विलास कुबल, सचिव पेद्रू रॉड्रीक्स, सदस्य रविंद्र राऊळ, हर्षद पारकर, सुनिल वालावलकर, सुनिल परब, बबन आंदुर्लेकर, संजय किनळेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार वैभव फटजी यांनी मानले.