खतांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आश्वासक उपक्रम
वेंगुर्ला,दि.३० ऑगस्ट (प्रथमेश गुरव)
वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे १ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत अजितकुमार परब यांनी कल्की आधारित सेंद्रिय शेतीचे सखोल मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
खतांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना आणि रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे माती, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी चिंता व्यक्त होत असताना, हवेतील घटकांचे वनस्पतींसाठी उपयुक्त पोषकद्रव्यांमध्ये रूपांतर करण्याचा अभिनव प्रयोग वेंगुर्ल्यातील अजितकुमार परब यांनी विकसित केला आहे.
या पद्धतीद्वारे घरच्या घरी जैविक खतनिर्मिती करता येत असल्याचे त्यांनी सिद्ध केले असून महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील शेकडो शेतकरी या पद्धतीचा वापर करत असल्याचे सांगण्यात येते. या प्रक्रियेसाठी गूळ, पाणी आणि विरजण एवच निविष्ठांची आवश्यकता असल्याचे परब यांनी सांगितले.
या पद्धतीचा वापर केल्यामुळे खतांवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे सहभागी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेती अधिक स्वावलंबी आणि कमी खर्चाची करण्याच्या दिशेने ही पद्धत उपयुक्त ठरत आहे.
वेंगुर्ला येथे होणाऱ्या या कार्यशाळेत खतनिर्मितीच्या पद्धतीसोबतच वनस्पतींचे रोगनिवारण, गुरांचे आरोग्य आणि परिसरातील स्वच्छता व शुद्धता याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे प्रवेश शुल्क १०० एवढे आहे. नावनोंदणीसाठी 9031852020 या क्रमांकावर व्हॉटस्अॅपद्वारे आपले नाव पाठवावे. शेती, आरोग्य आणि पर्यावरण यांविषयी तळमळ असलेल्या व्यक्तींनी या कार्यशाळेस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कल्की परिवारातर्फे केले आहे.