समुद्रकिनारी आपत्तीजन्य परिस्थितीत नागरिकांचे स्थलांतर, निवारा व आरोग्य व्यवस्थेबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक
विजयदुर्ग,दि.०४ ऑक्टोंबर
चक्रीवादळासारखी आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासन आणि नागरिकांनी कोणत्या पद्धतीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात, याबाबत शासनाच्या आदेशानुसार विजयदुर्ग येथे प्रत्यक्ष रंगीत तालीम घेण्यात आली. देवगडच्या तहसीलदार शितल जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रात्यक्षिकात समुद्रकिनारी तसेच बंदर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या विनंतीला प्रतिसाद देत विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाने या रंगीत तालीममध्ये सक्रिय सहभाग घेतला. चक्रीवादळामुळे समुद्रकिनारी तुफानी परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी कशा पद्धतीने स्थलांतर करावे, याबाबत ग्रामस्थ आणि मच्छीमार बांधवांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी स्थलांतरित नागरिकांसाठी निवारा व्यवस्था, आवश्यक त्या ठिकाणी आरोग्य तपासणी, सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया तसेच आपत्तीच्या काळात प्रशासनाशी समन्वय साधण्याबाबत प्रात्यक्षिकातून माहिती देण्यात आली. आपत्तीच्या काळात विविध शासकीय विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या रंगीत तालीम कार्यक्रमाला देवगडच्या तहसीलदार शितल जाधव, विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे सरपंच रियाज काझी, ग्रामपंचायत सदस्य, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांच्यासह प्रशासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते.
तसेच विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे गाव अध्यक्ष चंद्रकांत बिडये, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, सचिव योगिता परुळेकर, सदस्य व विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महेश बिडये, मार्गदर्शक विश्वनाथ गडकर, सदस्य जयाभाऊ डोंगरे, सत्यवान कदम, सदस्या प्रियांका कदम यांच्यासह विजयदुर्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.