तासगाव-सांगली येथील पर्यटकांना स्थानिकांची मदत; उपचारानंतर प्रकृती स्थिर
मालवण,दि.२६ मे
देवबाग भानजीवाडी येथील समुद्र स्नानाचा आनंद घेताना समुद्रात बुडत असलेल्या संतोष माळी (वय ४३) वं सिद्धार्थ माळी (वय १६) या तासगाव सांगली येथील दोघा पर्यटकांना स्थानिकांनी वाचविले. या दोघांनाही मालवण मधील खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारानंतर दोघांचीही प्रकृती स्थिर बनली होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तासगाव सांगली येथील माळी कुटुंबीय मालवण देवबाग येथे पर्यटनासाठी आले होते. आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास या कुटुंबातील चारजण देवबाग भानजीवाडी येथील समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी उतरले होते. मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष माळी व सिद्धार्थ माळी हे दोघे समुद्रात ओढले जाऊन बुडू लागले. यावेळी माळी कुटुंबियांनी आरडाओरडा केला असता स्थानिक रहिवासी अल्बर्ट वर्देकर, बस्त्याव वर्देकर, जॉनी लुद्रिक यांच्यासह इतरांनी समुद्रात धाव घेत बुडणाऱ्या दोघांनाही पाण्याबाहेर काढले. मात्र दोघांचीही प्रकृती अत्यवस्थ बनल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून मालवण मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यावर दोघांचीही प्रकृती स्थिर होऊन दुपारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.