Malvan news : ‘रघु पर्व’मधून रघुनाथ कदम यांना अनोखी आदरांजली

शेअर करा

कला सादरीकरणातून रघुकाकांच्या आठवणींना उजाळा

मालवण,दि.२७ऑक्टोंबर

ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक स्व. रघुनाथ कदम उर्फ रघुकाका यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रघुप्रेमी परिवाराच्या वतीने आयोजित ‘रघु पर्व’ हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात कलाकारांनी मुलाखती, नाट्यपदे, नाट्य प्रवेश व इतर कला सादरीकरणातून रघुनाथ कदम यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला सिंधुदुर्गातील रंगकर्मी, कलाकार, रघुकाकांचे शिष्य आणि रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमात सायंकाळी सहा वाजता रघुनाथ कदम यांच्या जीवनप्रवासावरील चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. त्यानंतर पडदा उघडताच रंगमंचावर ठेवलेली रघुकाकांची खुर्ची, जॅकेट, सदरा, चप्पल आणि स्पॉटलाईटमधील त्यांचे छायाचित्र पाहून उपस्थित भावुक झाले.

शरद सावंत यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे लेखक-दिग्दर्शक संभाजी सावंत यांनी ‘रघुनाथ कदम : नट, दिग्दर्शक आणि माणूस’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर निलेश पवार यांनी संभाजी सावंत यांची ‘रघुनाथ कदम : नाटक – लोकल टू ग्लोबल’ या विषयावर प्रकट मुलाखत घेतली. नाटकाचे सामाजिक मूल्य, दिग्दर्शकाची भूमिका, हौशी, प्रायोगिक, समांतर आणि व्यावसायिक रंगभूमीचे स्वरूप तसेच प्रश्न विचारणाऱ्या नाटकांची आजच्या काळातील गरज यावर या संवादात विचारमंथन झाले. रघुनाथ कदम यांनी पंचवीस वर्षे कोकणात जपलेला रंगभूमीचा वारसा पुढे नेण्याचे आवाहनही करण्यात आले.

दुसऱ्या सत्रात रघुनाथ कदम यांच्या शिष्यवृंदाने कला सादरीकरणातून आदरांजली वाहिली. प्रियंका मुसळे हिने ‘तुका म्हणे आता’ या नाटकातील नाट्यपद सादर केले. सुदिन तांबे यांनी संतूची भूमिका आणि गायनातून उपस्थितांची दाद मिळवली. मंगल राणे आणि निलेश पवार यांनी अजय कांडर लिखित ‘कळत्या नकळत्या वयात’ या कवितेतील भाग सादर केला. प्राजक्ता वाडये हिने ‘भिंती’ या नाटकातील प्रवेश, तर धनराज चंद्रकांत याने रघुकाकांनी दिग्दर्शित केलेली उदय प्रकाश लिखित ‘नेलकटर’ ही हिंदी कथा सादर केली.

या कार्यक्रमास वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली, अक्षर सिंधू साहित्य कला मंच कणकवली, कलांकुर मालवण, अष्टपैलू कलानिकेतन मालवण, मित्र शिरगाव, चैत्राली प्रोडक्शन, निलराज प्रोडक्शन, रंगखांब कणकवली आणि ज्या सांस्कृतिक संस्थांसोबत रघुनाथ कदम यांनी काम केले होते त्यांचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शिष्यवृंदाचे नातेवाईक, रघुकाकांचे मित्र वर्ग, चाहते, यांच्यासोबत डॉ. राजेंद्र चव्हाण, प्रसाद घाणेकर, डॉ. सतीश आणि सई लळीत, विजय चव्हाण अशी सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

प्रमुख पाहुणे संभाजी सावंत यांचा सन्मान रंगकर्मी डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. तर सादरीकरण करणाऱ्या कलाकारांचा सन्मान संभाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. राजेंद्र कदम यांनी आभार मानले. सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले.

शेअर करा