सावंतवाडी, दि. १३ जून
हैदराबादहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरने आंबोली घाटात समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात आणखी एका वाहनाचेही नुकसान झाले आहे. अपघात केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या कंटेनर चालकाला अखेर झाराप झिरो पॉईंट येथे वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद ते कुडाळ असा जाणारा कंटेनर (क्र. TG 07 E 4751) घेऊन चालक परमेश्वर वर्मा हा आंबोली घाटातून जात होता. घाटातील केसरी गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका वळणावर, चालकाने कंटेनर अतिवेगाने आणि निष्काळजीपणे चालवून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ‘सियाझ’ कारला (क्र. MH 03 CB 8619) जोरदार ठोकर दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बाजूने जाणाऱ्या एका टाटा पंच गाडीच्या उजव्या बाजूच्या आरशालाही कंटेनरने हुलकावणी दिली.
दुचाकीस्वारांनी केला पाठलाग:
अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळी न थांबता कुडाळच्या दिशेने वेगाने निघून गेला. हा प्रकार पाहून दोन दुचाकीस्वारांनी त्याचा पाठलाग केला आणि बुरडी पुलाजवळ त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे काही वेळ थांबून, गाडीखाली न उतरताच चालकाने दुचाकीस्वारांना हुलकावणी दिली आणि पुन्हा गाडी पळवली. शेवटी झारा झिरो पॉईंट येथे वाहतूक पोलीस आणि काही नागरिकांनी सतर्कता दाखवत या कंटेनरला अडवून चालकाला ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
अतिवेगाने व धोकादायक रित्या वाहन चालवून अपघात करणे, वाहनांचे नुकसान व लोकांना किरकोळ दुखापतीस कारणीभूत ठरणे आणि अपघातस्थळावरून पळून जाणे, याप्रकरणी चालक परमेश्वर वर्मा याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे.
दरम्यान, अपघात घडल्यानंतर आणि कंटेनर थांबवल्यानंतर चालकाला झालेल्या मारहाणीबाबतही पोलिसांकडून कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. तसेच, कंटेनर चालक आणि सियाझ कार चालक या दोन्ही चालकांनी मद्यप्राशन केले होते का, याची तपासणी करण्यासाठी आणि त्यांना झालेल्या दुखापतींबाबत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.