नवी मुंबई : कोकण विभागातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

शेअर करा

ठाणे, पालघरसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांत पाण्याचा विसर्गही सुरू

नवी मुंबई,दि.०४ जुलै

कोंकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण विभागातील प्रमुख जलप्रकल्पांमधील पाणीसाठ्यात अत्यंत समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणांमध्ये उपयुक्त पाण्याचा साठा सातत्याने वाढत असून, यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची चिंता तूर्तास मिटली आहे. या सर्व विभागांमध्ये सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांवर प्रशासनाचे बारीक लक्ष असून सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
ठाणे जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्पांपैकी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भातसा प्रकल्पात सर्वाधिक 273.45 दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. त्याखालोखाल बारवी प्रकल्पात 79.82 दशलक्ष घनमीटर, मोडकसागर प्रकल्पात 29.857 दशलक्ष घनमीटर तर तानसा जलप्रकल्पात 9.709 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
पालघर जिल्ह्यातील धामणी प्रकल्पात 80.905 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा नोंदवला गेला असून, कवडास प्रकल्पामध्ये 10.35 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे.
रायगड जिल्ह्यात सध्या 1 मध्यम प्रकल्प कार्यरत असून 28 लघु प्रकल्पांपैकी 4 लघु प्रकल्प त्यांच्या पूर्ण क्षमतेने म्हणजेच 100 टक्के भरले आहेत. रायगडमधील हेटवणे प्रकल्प 29.73 टक्के भरला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गडनदी प्रकल्पात 48.19 दशलक्ष घनमीटर, अर्जुना प्रकल्पात 37.124 दशलक्ष घनमीटर तर नातूवाडी जलप्रकल्पामध्ये 10.317 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या योजनांना मोठा आधार मिळाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘तिलारी’ प्रकल्पात तब्बल 447.369 दशलक्ष घनमीटर इतका प्रचंड उपयुक्त पाण्याचा साठा उपलब्ध आहे, जो संपूर्ण विभागात सर्वाधिक ठरला आहे. जिल्ह्यातील अरुणा जलप्रकल्पात 92.025 दशलक्ष घनमीटर साठा असून या धरणातून सध्या 2.31 घनमीटर प्रति सेकंद (घमी/सेकंद) या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय कोर्ले-सातंडी मध्यम प्रकल्पात 25.474 दशलक्ष घनमीटर आणि देवघर मध्यम प्रकल्पामध्ये 98.02 दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा उपलब्ध झाला आहे. धरणांमधील या वाढत्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष चोवीस तास लक्ष ठेवून आहेत.

शेअर करा