​सावंतवाडी नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या; बबन साळगावकरांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी

शेअर करा


​सावंतवाडी, दि. २१ मे
सावंतवाडी नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा, यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्र्यांना एक लेखी निवेदन पाठवले आहे.
​सावंतवाडी नगरपरिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे प्रशासकीय कामांना प्रचंड विलंब होत आहे. तसेच मुख्याधिकाऱ्यांअभावी नगरपालिकेच्या प्रशासनात कोणतीही एकसंघता राहिलेली नाही, असा आरोप साळगावकर यांनी केला आहे. याचा थेट फटका स्थानिक नागरिकांना बसत असून त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
​सध्या शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही त्याचे योग्य निवारण केले जात नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या विषयात स्वतः लक्ष घालून सावंतवाडी नगरपरिषदेला एक सक्षम आणि चांगला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळवून द्यावा, अशी मागणी बबन साळगावकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

शेअर करा