सावंतवाडी : मळगाव-निरवडे रस्त्यावर खैराच्या लाकडांची अवैध वाहतूक उघड; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

शेअर करा

वनविभागाची कारवाई; बोलेरो पिकअपसह २.८९ घनमीटर खैराचे लाकूड ताब्यात

​सावंतवाडी,दि.१३ ऑगस्ट
मळगाव-निरवडे रस्त्यावर विनापरवाना चाललेली खैराच्या लाकडांची अवैध वाहतूक सावंतवाडी वनविभागाने कारवाई करत उघडकीस आणली आहे. या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह २.८९ घनमीटर खैराचे लाकूड जप्त करण्यात आले असून, एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
​मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १२ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पाडलोस वनरक्षक यांच्याकडे प्रथम गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH 07 AJ 0087) उपरल विक्री आगार येथे जमा करण्यात आले आहे.
​ही कारवाई उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा, सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे आणि सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजगावचे वनपाल विजय दाते, पाडलोसचे वनरक्षक प्रकाश राणगीरे, सावंतवाडी फिरते पथक व सावंतवाडी वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणी वनविभागाकडून पुढील अधिक तपास सुरू आहे.

शेअर करा