Sindhudurg News:पणजी येथे ६ नोव्हेंबर रोजी डाक अदालत

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि.०४ नोव्हेंबर

भारतीय डाक विभागाच्या गोवा क्षेत्रीय कार्यालयामार्फत डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सोमवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी येथे ‘पोस्टल पेन्शन अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. या क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात गोवा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे.
डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनासंबंधी ज्या तक्रारींचे तीन महिन्यांच्या आत निराकरण झालेले नाही किंवा संबंधितांकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची या पेन्शन अदालतमध्ये दखल घेण्यात येणार आहे. तथापि, उत्तराधिकारासारखी कायदेशीर प्रकरणे तसेच धोरणात्मक स्वरूपाच्या तक्रारींचा या अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.
तक्रार अर्जामध्ये तक्रारीचा संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक आहे. यामध्ये मूळ तक्रार सादर केल्याची तारीख, ज्या अधिकाऱ्यांकडे तक्रार पाठविण्यात आली त्यांचे नाव व पदनाम तसेच तक्रारीशी संबंधित अन्य आवश्यक माहिती नमूद करावी. तक्रार अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
इच्छुक निवृत्तीवेतनधारकांनी आपले तक्रार अर्ज वरिष्ठ लेखाधिकारी तथा सचिव, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी – ४०३००१ यांच्याकडे अतिरिक्त प्रत सह दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा पद्धतीने पाठवावेत. तक्रार अर्ज [email protected] या ई-मेल पत्त्यावरही पाठविता येतील. दि. ४ नोव्हेंबर २०२६ नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.
तक्रार अर्जामध्ये निवृत्तीवेतनधारकाचे किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे नाव व निवृत्ती अथवा मृत्युसमयीचे पदनाम, निवृत्त झालेल्या कार्यालयाचे नाव व निवृत्तीची तारीख, पीपीओ क्रमांक, ज्या पोस्ट ऑफिसमधून निवृत्तीवेतन घेतले जाते त्या पोस्ट ऑफिसचे नाव, संपूर्ण पत्रव्यवहाराचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक, तक्रारीचा सविस्तर तपशील तसेच अर्जदाराची स्वाक्षरी व दिनांक नमूद करणे आवश्यक आहे.
डाक विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांनी या पेन्शन अदालतीचा लाभ घेऊन आपल्या प्रलंबित निवृत्तीवेतनविषयक तक्रारी विहित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा