Kankavli News : दिवाळी बाजारातील विक्रेत्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करावा!

शेअर करा

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे आवाहन; शहर विकास आघाडीच्या दिवाळी बाजाराचे उत्साहात उद्घाटन

कणकवली,दि.०४ नोव्हेंबर

शहर विकास आघाडीतर्फे यंदा प्रथमच कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बाजाराला विक्रेते आणि ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विक्रेत्यांनी दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वस्तू दर्जेदार आणि योग्य दरात उपलब्ध करून देत ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. या बाजारामुळे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन त्याचा फायदा ग्राहकांना मिळेल, तसेच स्थानिक बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.

शहर विकास आघाडीतर्फे आयोजित दिवाळी बाजाराचे उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पारकर म्हणाले, कणकवली शहराला कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांचा वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे नेण्याचे काम आम्ही करीत आहोत. दिवाळीनिमित्त शहरात बाजार भरविण्याची संकल्पना उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी मांडली. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शहर विकास आघाडीचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. पहिल्याच वर्षी २५ ते ३० विक्रेत्यांनी आपले स्टॉल उभारले असून त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या वर्षी आयोजन करताना काही त्रुटी राहिल्या असतील तर आयोजकांना सहकार्य करावे. पुढील वर्षी विक्रेते आणि ग्राहकांसाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी दिवाळी सणाचे धार्मिक व पौराणिक महत्त्व विशद करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक म्हणाले, शहर विकास आघाडीतर्फे प्रथमच आयोजित केलेल्या दिवाळी बाजाराला विक्रेते आणि ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. हा उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी विक्रेते व ग्राहकांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यांची पुढील वर्षी निश्चितपणे अंमलबजावणी केली जाईल. कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहरवासीयांनी शहर विकास आघाडीवर विश्वास दाखविला आहे. या माध्यमातून जनतेच्या विकासाबाबतच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, संकेत नाईक, लुकेश कांबळे, नगरसेविका सुमेधा आंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर, माजी नगरसेवक उमेश वाळके, कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, माजी नगरसेविका समृद्धी पारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, दिव्या साळगावकर, शीतल मांजरेकर, रिना जोगळे, अॅड. सुदीप कांबळे, बबली राणे, तेजस राणे, वैभव मालंडकर, सौरभ पारकर, पराग म्हापसेकर आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर संदेश पारकर, सुशांत नाईक यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाजारातील विविध स्टॉलना भेट देऊन विक्रेत्यांशी संवाद साधला आणि बाजाराची पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश खटावकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विक्रेते, ग्राहक आणि शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा