बांदा : ‘आता तरी देवा माका पाव’ पथनाट्यातून ई-पीक पाहणी व ऍग्रीस्टॅक नोंदणीचा प्रभावी संदेश

शेअर करा

सावंतवाडीतील महास्वराज्य समाधान शिबिरात पथनाट्याला शेतकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; कृषी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वेळेत नोंदणीचे आवाहन

बांदा,दि.०३ ऑगस्ट

शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ वेळेत मिळवायचा असेल, तर ई-पीक पाहणी आणि ऍग्रीस्टॅक नोंदणी करणे अत्यावश्यक असल्याचा प्रभावी संदेश महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘आता तरी देवा माका पाव’ या पथनाट्याच्या माध्यमातून दिला.
सावंतवाडी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिरात सादर करण्यात आलेल्या ‘आता तरी देवा माका पाव’ या पथनाट्याला शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मनोरंजनासोबतच प्रबोधन करणाऱ्या या सादरीकरणाने उपस्थितांमध्ये ई-पीक व ऍग्रीस्टॅकबाबत जनजागृती घडवून आणली.
या पथनाट्यात शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी व ऍग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य असल्याचा संदेश अत्यंत सोप्या आणि परिणामकारक पद्धतीने मांडण्यात आला. बदलत्या कृषी व्यवस्थेत डिजिटल नोंदणीचे महत्त्व, त्यातून मिळणारे शासकीय लाभ आणि शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी न केल्यास होणारे संभाव्य नुकसान यावरही प्रकाश टाकण्यात आला.
पथनाट्यात आरोसच्या ग्राम महसूल अधिकारी वर्षा नाडकर्णी, पाडलोसच्या ग्राम महसूल अधिकारी सुप्रिया शेळके, आरोसचे पोलिस पाटील महेश आरोसकर तसेच मडुराचे पोलिस पाटील नितीन नाईक यांनी प्रभावी भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयाला उपस्थित शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
महसूल विभागाचा स्तुत्य उपक्रम
पथनाट्याद्वारे जनजागृती करण्याचा महसूल विभागाचा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातील कृषी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने ई-पीक पाहणी व ऍग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी, असा संदेश या पथनाट्यातून प्रभावीपणे देण्यात आला.

शेअर करा