“हॉटेल रुचकर”वर धडक कारवाई सुरू
कुडाळ,दि.०४ सप्टेंबर
कुडाळ येथील आरोग्य विभागाच्या मोकळ्या शासकीय जागेत करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणावर अखेर आरोग्य विभागाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या धडक मोहिमेअंतर्गत परिसरातील ‘हॉटेल रुचकर’वर प्रशासनाकडून निष्कासनाची कारवाई केली जात असून, आज संध्याकाळी ६:०० वाजल्यापासून या धडक कारवाईला प्रारंभ झाला आहे.
आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कुडाळ नगरपंचायतीचे कर्मचारी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून हे अतिक्रमण हटवण्याचे काम करत आहेत. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या या अचानक आणि आक्रमक भूमिकेने शहरातील अनधिकृत अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

सायंकाळी सुरू झालेली ही कारवाई उशिरा रात्रीपर्यंत धडकपणे सुरूच होती. कुडाळमधील मोक्याच्या ठिकाणी प्रशासनाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर निष्कासनाचे काम चालले असल्याने, ही कारवाई पाहण्यासाठी घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांची आणि बघ्यांची प्रचंड गर्दी जमली आहे. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे.