तृतीय सुधारित अंदाजपत्रकास शासनाची मंजुरी; देवगडच्या मच्छीमारांना अत्याधुनिक सुविधांचा मार्ग मोकळा
देवगड,दि.०४ सप्टेंबर
देवगड तालुक्यातील बहुप्रतीक्षित आनंदवाडी मत्स्य बंदर प्रकल्पाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाने 171.66 कोटी रुपयांच्या तृतीय सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने 2 सप्टेंबर 2026 रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे आनंदवाडी मत्स्य बंदर प्रकल्पाला मोठी चालना मिळाली असून, देवगडच्या मच्छीमारांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी आनंदवाडी बंदर प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्पाच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे.
देवगड आनंदवाडी येथे लहान मच्छीमारी बंदर विकसित करून मच्छीमारांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वी 88.44 देण्यात आली होती. मात्र मच्छीमारांची वाढती मागणी, नेव्हिगेशनल चॅनेलच्या रुंदीमध्ये झालेली वाढ, मूळ अंदाजपत्रकात Sinkage चा समावेश नसणे आणि त्यातील वाढ यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला.त्यानुसार आता 172.74कोटी रुपयांचे तृतीय सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यास तांत्रिक मान्यता दिली आहे. केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाने २५ कोटी रुपये केंद्र हिस्सा आणि १७१.६६ कोटी रुपये राज्य हिस्सा, अशा एकूण 196.66 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास काही अटींच्या अधीन मान्यता दिली आहे. केंद्र शासनाकडून यापूर्वीच 25 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून यापुढे केंद्राचा हिस्सा उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वाढीव खर्चाचा भार राज्याच्या हिस्स्यातून उचलावा लागणार आहे.
अत्याधुनिक सुविधांचा समावेश
171.66 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकात आनंदवाडी बंदराच्या विविध पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ड्रेजिंग, रिक्लमेशन, रिव्हेटमेंट, अप्रोच रोड, आरसीसी क्वे, अंतर्गत रस्ते, फिश ऑक्शन हॉल, मत्स्यव्यवसाय प्रशासकीय कार्यालय, गिअर शेड, नेट मेंडिंग शेड, विश्रांतीगृह, बोट दुरुस्ती कार्यशाळा, कॅन्टीन, मत्स्य व्यापारी व एजंटसाठी डॉर्मिटरी, रेडिओ व कम्युनिकेशन सेंटर, सार्वजनिक स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, पाणीपुरवठा, ड्रेनेज-सिव्हरेज व्यवस्था तसेच ग्रीनरी व लँडस्केपिंग आदी सुविधांचा समावेश आहे.या मत्स्य बंदराचे बांधकाम महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेतच प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. तसेच भविष्यात प्रकल्पाच्या किमतीत वाढ होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आवश्यक परवानग्या प्राप्त केल्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरू करावे, तसेच प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीचा दर तिमाही आढावा घेऊन शासनाला अहवाल सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.आनंदवाडी मत्स्य बंदराला मिळालेल्या या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे देवगड तालुक्यातील मच्छीमारांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे. फिश ऑक्शन हॉल, बोट दुरुस्ती सुविधा, जाळी दुरुस्ती शेड, विश्रांतीगृहे, रस्ते, वीज व पाणीपुरवठा अशा सुविधांमुळे देवगडच्या मत्स्य व्यवसायाला अधिक संघटित आणि सक्षम स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे