प्रितेश (भाई) केसरकर व संदेश शेगडे यांच्या धाडसाने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले
बांदा,दि.२९ जून
बांदा येथील मोर्येवाडी परिसरातील सोसायटीजवळील वस्तीच्या आवारात सोमवारी अचानक मगर आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मगरीची माहिती मिळताच तिला पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.
गर्दी आणि गोंधळामुळे मगर घाबरून जवळ उभ्या असलेल्या एका डंपरच्या चाकाचा आडोसा घेऊन लपून बसली. त्यामुळे मगरीला पकडणे अधिक आव्हानात्मक ठरले.
घटनेची माहिती मिळताच बांदा येथील व्यावसायिक प्रितेश (भाई) केसरकर व संदेश शेगडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत सावधगिरीने व संयमाने मगरीला डंपरच्या चाकाजवळून हळूहळू बाहेर काढले. मात्र, बाहेर येताच मगर आक्रमक झाली. अशावेळी प्रसंगावधान राखत प्रितेश (भाई) केसरकर यांनी कौशल्याने मगरीच्या अंगावर गोणपाटाची पिशवी टाकून तिच्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर संदेश शेगडे यांनीही धाडसाने सहकार्य करत मगरीला सुरक्षितपणे पकडले.
यानंतर मगरीला कोणतीही इजा न होता तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आले. या धाडसी आणि संयमी कृतीमुळे परिसरातील नागरिकांवरील संभाव्य धोका टळला. प्रितेश (भाई) केसरकर व संदेश शेगडे यांच्या धाडसाचे उपस्थित ग्रामस्थांनी कौतुक केले.