बांदा : विलवडेतील जिल्हा मार्ग चिखलमय; विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

शेअर करा

बांदा ,दि.०३ ऑगस्ट
बांदा–दाणोली या जिल्हा मार्गाच्या रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम मे महिन्यापासून सुरू असले तरी कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने विलवडे परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विलवडे हायस्कूल ते विलवडे ग्रामपंचायत कार्यालयापर्यंतचा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांची अक्षरशः कसरत होत आहे.
रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, साचलेला चिखल आणि उखडलेला मार्ग यामुळे या परिसरातील वाहतूक धोकादायक बनली आहे. विलवडे तिठा आणि वरचीवाडी येथे परिस्थिती अधिक गंभीर असून पादचाऱ्यांनाही चालणे कठीण झाले आहे. पावसामुळे चिखल वाढल्याने दुचाकी घसरण्याच्या घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात असून, कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, या मार्गावरून आंबोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची संख्या मोठी आहे. काही वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गावर पोलीस प्रशासनाने नियमित गस्त घालून अति वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विलवडे ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी यांनी केली आहे.
दरम्यान, संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन रस्त्यावरील चिखल हटवून खड्डे बुजवावेत आणि सुरू असलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

शेअर करा