जि. प. सदस्य नितीन राऊळ : बालस्नेही पंचायतला भेट देऊन विद्यार्थ्यांचा केला गौरव
बांदा,दि.२३ जून
ओम गणेश बालसभेमुळे पाडलोसची ‘बालस्नेही पंचायत’ म्हणून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. या बालसभेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नावलौकिक झाले आहे. त्यामुळे या बालस्नेही पंचायतीच्या अभिनंदनाचा ठराव घेणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य, इन्सुली तथा सिंधुदुर्ग शिक्षण समिती सदस्य नितीन राऊळ यांनी सांगितले.
पाडलोसची बालस्नेही पंचायत म्हणून प्रथम क्रमांकाने निवड झाल्याने श्री. राऊळ यांनी भेट देत उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सरपंच सलोनी पेडणेकर, स्वराज सेवा संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, उद्योजक सागर राणे, सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ पंडित, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, मुख्याध्यापक विजय गावडे, शिक्षक अनिल वरक, ग्रामस्थ दिलीप गावडे, पालक मयुरी कुबल आदी उपस्थित होते.
नितीन राऊळ यांनी विद्यार्थ्यांचा पुस्तके, वह्या तसेच अन्य शैक्षणिक साहित्य देऊन गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विजय गावडे यांनी करताना शाळा दुरुस्ती प्रस्तावाकडे सदस्यांचे लक्ष वेधले. प्रास्ताविक शिक्षक अनिल वरक यांनी केले. सरपंच सलोनी पेडणेकर यांनी आभार मानले.
अभिनंदनाचा घेणार ठराव
ओम गणेश बालसभा ही विद्यार्थ्यांना मिळालेले एक व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार. ‘विषय सिंधुदुर्गचा, कौशल्य विद्यार्थ्यांचे’ या उपक्रमाखाली चित्रकला स्पर्धा घेणार. तसेच या बालस्नेही पंचायतीच्या अभिनंदनाचा ठराव घेणार असल्याचे नितीन राऊळ यांनी सांगितले.