बांधावर पाहणी; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के भरपाईचे आश्वासन
बांदा,दि.०३ ऑक्टोंबर
न्हावेली गावात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा मोठा फटका भातशेतीसह इतर पिकांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव तसेच गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर, आरती माळकर यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती जाणून घेत प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. कमी पावसामुळे भातासह इतर पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम यावेळी निदर्शनास आला. पाहणीनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.