बांदा : उड्डाणपुलाखालील रस्त्याची दुरवस्था; खड्डे, चिखलामुळे नागरिक त्रस्त

शेअर करा

मुसळधार पावसाचा फटका; कट्टा कॉर्नर परिसरातील रस्त्यावर मोठे खड्डे, वाहनचालक, पादचारी आणि व्यापाऱ्यांना मोठा मनस्ताप

बांदा,दि.०२ जुलै

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा शहरातील कट्टा कॉर्नर येथील उड्डाणपुलाखालील रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे, त्यात साचलेले पाणी आणि चिखलामुळे वाहनचालक, पादचारी तसेच व्यापारी वर्गाला मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

बांदा कट्टा कॉर्नर हा गोवा–मुंबई महामार्ग, दाणोली–आंबोली मार्ग तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेला जोडणारा महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र उड्डाणपुलाखालील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून अपघाताचा धोका वाढला आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी व चिखल साचल्याने दुचाकीस्वारांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी घसरून पडण्याच्या घटनाही घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पादचाऱ्यांनाही चिखलातून मार्ग काढताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी जोरदार मागणी नागरिक व व्यापारी वर्गातून होत आहे.

शेअर करा