कास सरपंच प्रवीण पंडित यांचा महावितरणला संतप्त सवाल
बांदा, दि. ०७ जुलै
शेतकरी तरुणांनी शेती करायची की वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी झाडे तोडायची? असा संतप्त सवाल उपस्थित करत कासचे सरपंच प्रवीण पंडित यांनी महावितरणच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.
न्हावेली, पाडलोस, रोणापाल, मडुरा, निगुडे, कास आणि सातोसे परिसरात सलग दोन दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्याने शेतकरी व नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीची महत्त्वाची कामे सुरू असताना वीजेअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून महावितरणच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, ही परिस्थिती हाताळण्यासाठी महावितरणकडे पुरेसे मनुष्यबळ किंवा तत्पर यंत्रणा नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, शेतकऱ्यांनाच शेतीची कामे बाजूला ठेवून झाडे तोडण्यासाठी पुढे यावे लागत असल्याचे चित्र आहे.
वीज बिल वेळेवर आणि अव्वाच्या सव्वा भरूनही ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळत नसल्याचा संतापही व्यक्त होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत महावितरणची यंत्रणा सतर्क का राहत नाही, असा सवाल उपस्थित करत ही सेवा नेमकी कोणासाठी आहे, अशी टीका करण्यात येत आहे.
…तर मोबदला द्यावा लागेल
शेतकरी व तरुणांकडून झाडे तोडण्याचे काम करून घेत असाल तर त्यांना त्याचा योग्य मोबदला द्यावा. अन्यथा अखंडित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा करावा. शेतकऱ्यांना शेती सोडून महावितरणची कामे करण्यास भाग पाडले जाणार असेल, तर तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल, असा इशारा कास सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला.