सावंतवाडी-मुंबई नवीन डेली एक्सप्रेस सुरू; गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणवासीयांना मोठा दिलासा

शेअर करा

सावंतवाडी,दि.०३ सप्टेंबर
गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी दरम्यान नवीन दैनिक (डेली) एक्सप्रेस रेल्वे सेवेचा शुभारंभ गुरुवारी दि. ३ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आला. या नवीन रेल्वेसेवेमुळे मुंबई आणि कोकणादरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, आरामदायी आणि सुखकर होणार आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित विशेष कार्यक्रमात या नव्या रेल्वेसेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदवला. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि महापौर रितू तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोकणवासीयांची गेल्या अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.
​नवीन गाडीचे वेळापत्रक आणि वैशिष्ट्ये:
​नियमित सेवा (ट्रेन क्र. १५०८८): ही गाडी सावंतवाडीवरून सायंकाळी ५:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ६:४० वाजता मुंबईत दाखल होईल. या वेळापत्रकामुळे नोकरदार वर्गाचा सुट्टीचा दिवस वाया न जाता रात्रीचा प्रवास सुखकर होणार आहे.
​उद्घाटनाची विशेष ट्रेन (ट्रेन क्र. ०१००१): शुभारंभाची विशेष गाडी मुंबई CSMT येथून दुपारी २:३० वाजता सुटली असून ती शुक्रवारी दुपारी २:०० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. या गाडीला २३ अत्याधुनिक ‘एलएचबी’ (LHB) डबे जोडण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी चिपळूण स्थानकावर गाडीत पाणी भरण्याची आणि साफसफाईची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून रात्री ११.५५ वाजता ही रेल्वे सुटणार आहे.
तळागाळातील गावे जोडण्याच्या दृष्टीने या एक्सप्रेसला दोन्ही मार्गांवर महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांचा समावेश आहे.
​प्रवाशांकडून जोरदार स्वागत:
सध्या कोकण रेल्वे मार्गावर तुतारी एक्सप्रेस आणि सावंतवाडी-दिवा पॅसेंजर गाड्यांना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक गाड्या हाऊसफुल्ल धावत असून सिंधुदुर्गात पुरेशा गाड्यांना थांबे नसल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत होते. अशा वेळी ही नवीन डेली एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे चाकरमानी, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांची मोठी सोय होणार असून, कोकणाच्या पर्यटन आणि आर्थिक विकासालाही गती मिळणार आहे. या नव्या रेल्वे भेटीचे संपूर्ण कोकणातून जोरदार स्वागत केले जात आहे.
कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, या रेल्वे गोवा मडगाव वरून सुटत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. आता अंशतः प्रवासी वर्गाला दिलासा मिळाला आहे असे सावंतवाडी प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी बोलताना सांगितले. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस वर नव्याने दाखल होणाऱ्या रेल्वे गाडीचे स्वागत करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

शेअर करा