पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा बंद होत असल्याने व्यापारी व व्यावसायिक त्रस्त; ॲड. प्रसाद करंदीकर यांच्या निषेध आंदोलनाला युवासेनेचा जाहीर पाठिंबा!
देवगड,दि.०२ नोव्हेंबर
देवगड-जामसंडे परिसरात महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांसह व्यापारी आणि व्यावसायिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः व्यवसायाच्या महत्त्वाच्या वेळेत वीजपुरवठा बंद होत असल्याने दुकानदार, हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटन व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
महावितरणच्या या अनियोजित कारभाराविरोधात महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी निषेध आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. याबाबत युवासेना तालुका प्रमुख गणेश जगदीश गांवकर यांनी भूमिका स्पष्ट केली.
वीजपुरवठा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक भाग आहे. देखभाल किंवा दुरुस्तीच्या कामासाठी वीज बंद ठेवायची असल्यास महावितरणने नागरिकांना आणि व्यावसायिकांना आगाऊ सूचना देणे आवश्यक आहे. मात्र, कोणतीही पूर्वकल्पना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित करणे अन्यायकारक असल्याचे गांवकर यांनी म्हटले आहे.
देवगड तालुक्यात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू असताना वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे स्थानिक व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे महावितरणने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, तसेच नियोजित वीजबंदबाबत ग्राहकांना वेळेत पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.