Devgad News : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधातील आंदोलनाला आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघाचा पाठिंबा

शेअर करा

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह नियोजित वीजबंदबाबत पूर्वसूचना देण्याची मागणी; ४ नोव्हेंबरच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

देवगड,दि.०२ नोव्हेंबर

देवगड-जामसंडे परिसरात महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिक आणि आंबा-काजू बागायतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अनियमित वीजपुरवठ्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून व्यावसायिकांचेही नुकसान होत आहे.

महावितरणच्या या कारभाराविरोधात महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी आयोजित केलेल्या निषेध आंदोलनाला आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघ, देवगडने जाहीर पाठिंबा दिला आहे. संघाचे अध्यक्ष काका ढोके यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

वीजपुरवठा ही नागरिकांची अत्यावश्यक गरज असून, कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीज बंद करणे योग्य नाही. महावितरणने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन वीजपुरवठा नियमित ठेवावा. तसेच देखभाल किंवा दुरुस्तीच्या कामासाठी वीज बंद करायची असल्यास ग्राहकांना आगाऊ सूचना द्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता महावितरण कार्यालय, देवगड (पवनचक्की) येथे हे निषेध आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघाचा सक्रिय पाठिंबा असून नागरिक, व्यापारी, व्यावसायिक आणि वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष काका ढोके यांनी केले आहे.

नागरिक आणि व्यावसायिकांच्या न्याय्य प्रश्नांसाठी संघटना नेहमीच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले

शेअर करा