वारगांव सरपंच नाना शेटये यांच्या पुढाकाराने टँकरने पाणीपुरवठा ; दशक्रोशीतील सरपंचांचे सहकार्य
कणकवली,दि.०२ नोव्हेंबर
खारेपाटण ग्रामपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणीटंचाई निर्माण झाली होती. आरोग्य केंद्रातील रुग्ण, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच दैनंदिन स्वच्छतेच्या कामांसाठी पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन वारगांव सरपंच नाना शेटये यांनी पुढाकार घेत दशक्रोशीतील सरपंचांच्या सहकार्याने टँकरद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्राला 10 हजार लिटरचा पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र हे परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्यसेवेचे केंद्र आहे.त्यामुळे टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी साळीस्ते , शिडवणे , वारगांव, कुरंगवणे, शेर्पे,वायंगणी, चिंचवली, नरडवे या गावातील सरपंचांनी सहकार्य केले. येथे उपचारासाठी येणारे रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाण्याअभावी गैरसोयीचा सामना करावा लागू नये, तसेच आरोग्य केंद्रातील स्वच्छता व आरोग्यसेवा विस्कळीत होऊ नये, या उद्देशाने सरपंच नाना शेटये यांनी तातडीने टँकरची व्यवस्था केली.सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या या मदतीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलासा मिळाला आहे.संकटाच्या काळात नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि आरोग्यसेवेला प्राधान्य देत सरपंच नाना शेटये यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे परिसरातून कौतुक होत आहे.