दारू विक्री तात्काळ बंद न झाल्यास २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा; प्रशासनाने त्वरित कारवाईची महिलांची मागणी
सावंतवाडी,दि.०३ सप्टेंबर
सांगेली, सावरवाड येथील भरारी महिला ग्राम संघाने जिल्हा पोलीस प्रमुख मोहन दहिकर यांची सावंतवाडी येथे भेट घेऊन कैफियत मांडली.
गावात दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. कुणाचा नवरा, तर कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ हा दारूच्या व्यसनामुळे मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत. दारूमुळे कुटुंबामध्ये वाद-भांडणे होत आहेत, त्यामुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागली असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
दारू विक्री व्यवसायाबद्दल अनेक वेळा सावंतवाडी पोलीस ठाण्यात निवेदने देऊन, तक्रारी दाखल करूनही पोलिसांनी कोणतीच दखल घेतली नाही. उलट पोलिसच तक्रार करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल करू, अशी धमकीवजा इशारा देतात, असा आरोप महिलांनी केला आहे.
आमच्या गावात दारू विक्री व्यवसाय करणाऱ्यांची दहशत वाढली आहे. अनेक वेळा ग्रामपंचायतींनी दारूबंदी बाबत ठराव घेतले, पण ते कागदावरच राहिले आहेत. दारूच्या व्यसनामुळे आतापर्यंत किती जणांचे बळी गेले आहेत. दारू विक्री व्यवसाय करणारे तक्रारदारांनाच मुजोरपणे शिवीगाळ, मारहाण असे प्रकार करत आहेत. या व्यवसाय करणाऱ्यांना साथ देणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.
तर, कलंबिस्त पंचक्रोशीत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस चौकी सुरू करण्यात यावी. या चौकीत बीट अंमलदार कायमस्वरूपी उपलब्ध असेल, अशी व्यवस्था करावी, तसेच सी.सी.टी.व्ही. कॅमेरेही बसवण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दारू विक्री व्यवसाय करून दहशत माजवणाऱ्या व्यक्तींवर तडीपाराची कारवाई करावी. ही कारवाई दोन ऑक्टोबरपर्यंत न झाल्यास आम्ही सर्व भरारी महिला ग्राम संघ जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
अध्यक्षा सुप्रिया पंढरीनाथ मडगावकर, सरपंच देवयानी पवार, सविता ठाकूर, लक्ष्मी गावडे, धनश्री पवार, सुनीता लाड, मानसी पवार, सुवासिनी न्हावी, स्नेहा कुडतरकर आदी महिलांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.
आम्ही तक्रारदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्हाला संरक्षण मिळावे, अशीही त्यांनी विनंती केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, एका तरुणाने या दारूधंद्याविरोधात आवाज उठवला म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर सदर दारू विक्री व्यवसाय करणाऱ्यांनीच पोलीस ठाण्यात जाऊन सावंतवाडी पोलिसांना हाताशी धरून सदर तरुणालाच पोलिसांनी, “तू दारूबंदी विरोधात का लढतोस? ही जबाबदारी तुझी नाही, तुला आम्ही आत टाकू,” अशी धमकी दिली. त्यामुळे जर पोलीस विभागच असे वागत असेल तर आम्ही कुणाकडे न्याय मागायचा, असा सवाल त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केला आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून भरारी महिला ग्राम संघ कलंबिस्त, सावरवाड भागातील दारू व्यसनापायी बळी पडलेल्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी धडपडत आहे. या पंचक्रोशीतील वैध-अवैध असे सर्वच दारू धंदे बंद करावेत आणि ही पंचक्रोशी दारूमुक्त करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने लक्ष द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.