सरपंचांकडे उपोषणाची पूर्वसूचना; प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
बांदा,दि.१२ ऑक्टोबर
बांदा येथील गडगेवाडी परिसरात भर लोकवस्तीत सुरू असलेले अनधिकृत वराह पालन तात्काळ बंद करावे या मागणीसाठी त्रस्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, गडगेवाडी येथे उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या उपोषणाची पूर्वसूचना देणारे निवेदन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्याकडे सादर करण्यात आले.
गडगेवाडी येथील भर लोकवस्तीत आवश्यक शासकीय परवानग्या व मान्यता न घेता वराह पालन सुरू असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. या वराह पालनामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता, घाण आणि सांडपाण्याची समस्या निर्माण झाली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. संबंधित वराह पालनासाठी ग्रामपंचायत, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग व इतर संबंधित विभागांच्या आवश्यक कोणत्याही परवानग्या न घेता बेकायदेशीर व नियमबाह्यपणे वराह पालन चालू आहे त्यामुळे त्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच भविष्यात अशा प्रकारच्या भर वस्तीत केल्या जाणाऱ्या वराह पालनाला कोणतीही परवानगी देण्यात येऊ नये, यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने या तक्रारीची तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २२ ऑक्टोबर रोजी उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी लाकूड व्यावसायिक आनंद गवस, तंटामुक्ती समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, गुरु कल्याणकर, विनोद सावळ, मकरंद तोरस्कर, ग्रामपंचायत सदस्य रूपाली शिरसाट, बाळू सावंत, श्यामसुंदर मांजरेकर आदी उपस्थित होते.