१२ लाखांहून अधिक नफा; आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दराचा लाभ, ‘देवगड हापूस भूषण’ पुरस्काराची घोषणाही
देवगड ,दि.२७ जून
देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, जामसंडेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कै. मोरेश्वर जनार्दन गोगटे सभागृहात संस्थेचे अध्यक्ष अॅड. अजितराव गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेला मोठ्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी दिवंगत सभासद, मान्यवर, देशासाठी बलिदान दिलेले जवान तसेच नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा अध्यक्ष अॅड. अजितराव गोगटे यांनी सभासदांसमोर मांडला.
संस्थेने हापूस आंब्याची रोखीने खरेदी, दर्जानुसार प्रतवारी, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, तसेच ग्राहक ते शेतकरी थेट विक्री साखळी उभारून आंबा उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मुंबई, पुणे, नागपूर, इंदूर यांसह विविध शहरांमध्ये तसेच ऑनलाइन माध्यमातून देवगड हापूसची विक्री करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दिल्ली येथे आयोजित आंबा महोत्सवात सहभाग घेत देवगड हापूसची लोकप्रियता वाढविण्यात संस्थेला यश आले असल्याचेही नमूद करण्यात आले.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेला १२ लाख ७ हजार ८६० रुपयांहून अधिक नफा झाला असून सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. तसेच यंदाच्या हंगामात संस्थेला आंबा विक्री केलेल्या सभासद शेतकऱ्यांना प्रतिडझन १० रुपये प्रोत्साहनपर वाढीव दर देण्याची घोषणा करण्यात आली. काही शेतकऱ्यांना यावेळी वाढीव दराचे धनादेशही प्रदान करण्यात आले.
संस्थेच्या माध्यमातून आंबा निर्यात वाढविण्यासाठी डि-सॅपिंग युनिट, हॉट वॉटर ट्रीटमेंट आणि रायपनिंग चेंबर उभारणीचे महत्त्वाचे ठराव सभेत मंजूर करण्यात आले. तसेच कोकणातील आंबा उत्पादकांसाठी स्वतंत्र आंबा बोर्ड स्थापन करावा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी करणारे ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
यावेळी देवगड तालुक्यातील प्रगतशील कार्याबद्दल प्रसन्न पद्माकर गोगटे यांना ‘देवगड हापूस भूषण पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला. संस्थेचे व्यवस्थापक संतोष पाटकर, अकाऊंटंट सचिन खवळे व अन्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला.
सभेच्या शेवटी संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत सभासदांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेवर विश्वास दाखवणाऱ्या सर्व सभासदांचे आभार मानत संस्था भविष्यातही शेतकरी हिताचे निर्णय घेईल, असा विश्वास अध्यक्ष अॅड. अजितराव गोगटे यांनी व्यक्त केला.