देवगड, दि.०९ जून
किंजवडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष किंजवडेकर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून किंजवडे गावातील दहा विद्यार्थिनींना महिला व बालविकास विभाग, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सायकलींचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी ये-जा करणे सुलभ व्हावे, तसेच शिक्षणात सातत्य राहावे या उद्देशाने हा प्रस्ताव राबविण्यात आला.
किंजवडे गावातील गरजू विद्यार्थिनींना सायकली मिळाव्यात यासाठी सरपंच संतोष किंजवडेकर यांनी महिला व बालविकास विभागाकडे प्रस्ताव सादर करून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे गावातील दहा विद्यार्थिनींना सायकली मंजूर झाल्या.
मंजूर झालेल्या सायकलींचे वितरण कार्यक्रम किंजवडे येथे पार पडला. यावेळी सरपंच संतोष किंजवडेकर व उपसरपंच विनय पाडावे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकली प्रदान करण्यात आल्या. सायकली मिळाल्याने विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना सरपंच संतोष किंजवडेकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असून भविष्यातही अशा विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे सांगितले.
या उपक्रमाबद्दल विद्यार्थिनी, पालक आणि ग्रामस्थांनी महिला व बालविकास विभाग तसेच ग्रामपंचायतीचे आभार मानले.