देवगड : आनंदवाडी जेटीवर खोल पाण्यात पडलेल्या गायीच्या वासराला जीवदान

शेअर करा

अक्षय हरम, नीलेश सावंत, उमेश मोहिते व बोटीच्या खलाशांचे धाडस; अथक प्रयत्नांनंतर दोरीच्या सहाय्याने केली सुखरूप सुटका

देवगड,दि.०२ ऑगस्ट

आनंदवाडी जेटी येथे रविवारी सकाळी एक हृदयस्पर्शी घटना घडली. आईसोबत चाऱ्याच्या शोधात फिरत असलेले गायीचे वासरू जेटीचा अंदाज न आल्याने अचानक खोल पाण्यात कोसळले. ही बाब लक्षात येताच परिसरात एकच धावपळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच अक्षय हरम, नीलेश सावंत, उमेश मोहिते तसेच तेथील बोटीवरील खलाशी यांनी क्षणाचाही विलंब न लावता वासराला वाचवण्यासाठी पाण्यात उतरून शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र घाबरलेल्या वासराने पाण्यात इकडेतिकडे पोहण्यास सुरुवात केल्याने बचावकार्य काही काळ कठीण झाले.

अखेर अथक प्रयत्नांनंतर वासराला पाण्यात पकडण्यात यश आले. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. वासरू सुखरूप बाहेर आल्यानंतर त्याच्या आईसह उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या धाडसी बचावकार्यात सहभागी झालेल्या अक्षय हरम, नीलेश सावंत, उमेश मोहिते आणि बोटीच्या खलाशांचे उपस्थित नागरिकांनी मनापासून कौतुक केले. त्यांच्या तत्परतेमुळे एका मुक्या जीवाचे प्राण वाचल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

शेअर करा