Devgad News : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे १० नोव्हेंबरला भव्य दीपोत्सव; ‘स्वरआनंदघन’ संगीत मैफिलीचे आयोजन

शेअर करा

कुणकेश्वर येथे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धाही रंगणार

देवगड, दि. ३० ऑक्टोबर

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसरात मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर ग्रामस्थ आणि श्री कुणकेश्वर सेवा मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडणार आहे. दीपोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह ‘स्वरआनंदघन’ या सुगम संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून भाविक आणि संगीतप्रेमींसाठी ही विशेष पर्वणी ठरणार आहे.

या सोहळ्यात सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत सुगम संगीताची मैफल रंगणार आहे. यामध्ये स्वरकोकण रत्न प्रसिद्ध गायक हर्षद मेस्त्री यांच्यासह गायिका मान्यता कुंटे आणि साक्षी मांजेरेकर आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. त्यांना प्रणव मैस्त्री, गंधार कदम, सार्थक जामदार, हर्षद खराडे आणि युवराज कुर्ले यांची वाद्यसाथ लाभणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन व निवेदन अभिनेते निलेश गुरव करणार आहेत.

सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेत पालखी प्रदक्षिणा, ७.३० वाजता दीपप्रज्वलन, तर रात्री ८.३० ते ९ या वेळेत सन्मान सोहळा पार पडणार आहे.

दीपोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी १ हजार ५०० रुपये, तर चतुर्थ क्रमांकासाठी १ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी आकाशकंदील तयार करताना बांबू, कागद, कापड, सुतळी यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे बंधनकारक आहे. प्लास्टिक, थर्माकोल आणि रेडीमेड चायनीज साहित्याचा वापर करता येणार नाही. कंदील स्वतः तयार केलेला असावा आणि त्याची उंची किमान दोन फूट असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी आपले कंदील ९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत कुणकेश्वर मंदिर येथे जमा करावेत. स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण सोहळा १० नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता मंदिर परिसरात होणार आहे.

या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात तसेच आकाशकंदील स्पर्धेत जास्तीत जास्त भाविक, ग्रामस्थ आणि स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सचिव हेमंत वातकर (७४९९१९९३९३) आणि विश्वस्त महेश जोईल (८२७५४६०२११) यांच्याशी संपर्क साधावा.

शेअर करा