विद्यमान सरपंच, उपसरपंच, महिला सदस्य व माजी सरपंचांसह अन्य संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे देवगड न्यायालयाचे निर्देश
देवगड, दि. ३० ऑक्टोबर
पोयरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत झालेल्या महिला मारहाण प्रकरणाला आता महत्त्वपूर्ण न्यायालयीन वळण मिळाले आहे. या प्रकरणात संशयित विद्यमान सरपंच, उपसरपंच, महिला सदस्य, माजी सरपंचांसह इतर संशयितांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देवगड न्यायालयाने दिले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, २१ मे २०२६ रोजी पोयरे ग्रामपंचायतीच्या नियोजित ग्रामसभेदरम्यान एका ५९ वर्षीय महिलेला मारहाण, सार्वजनिक ठिकाणी विनयभंग, शिवीगाळ तसेच दागिने हिसकाविल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर पीडित महिलेने देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात केवळ अदखलपात्र गुन्हयाची (एनसी) नोंद केली होती. गंभीर स्वरूपाच्या आरोपानंतरही नियमित एफआयआर दाखल न झाल्याने पीडित महिलेने न्यायालयात धाव घेत बीएनएसएस कलम १७३ व १७५ (३) अंतर्गत अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने तसेच पोलिसांनी अर्ज फेटाळण्याबाबत घेतलेले आक्षेप न्यायालयाने फेटाळून लावत अर्ज मंजूर केला. न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे पीडित महिलेला मारहाण करणे, सार्वजनिक ठिकाणी तिच्या विनयभंगासदृश कृत्य करणे, शिवीगाळ करणे आणि तिचे दागिने हिसकाविणे यासारखे दखलपात्र गुन्हे घडल्याचे स्पष्ट निरीक्षण नोंदविले. त्यामुळे या प्रकरणात सखोल पोलीस तपास होणे आवश्यक असल्याचे नमूद करत देवगड पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.