देवगडातील सहा हजार शेतकऱ्यांना प्रति कलम २२० रुपयांप्रमाणे मदतीची प्रतीक्षा; आंबा-काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांची मागणी
देवगड,दि.२७ ऑगस्ट
गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर सरकारने देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति कलम २२० रुपये याप्रमाणे मदत जाहीर केली आहे. त्यानुसार सुमारे सहा हजार शेतकऱ्यांची यादीही तयार करण्यात आली आहे. मात्र, गणेश चतुर्थीचा सण तोंडावर आला असताना ही मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे सरकारने गणेश चतुर्थीपूर्वी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी प्रमुख मागणी देवगड तालुका आंबा-काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी केली.
काका ढोके यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ही मदत वेळेत मिळाल्यास त्यांना सणाच्या काळात मोठा दिलासा मिळू शकतो. शासनाने मदत जाहीर करून त्याची यादीही तयार केली आहे, त्यामुळे आता कोणतीही दिरंगाई न करता तातडीने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी.यावेळी त्यांनी पीक विम्याच्या प्रश्नावरही सरकारला धारेवर धरले. देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून विम्याचे हप्ते भरले असून विमा कंपनीकडे केंद्र व राज्य सरकारच्या सहभागासह शेतकऱ्यांचे मिळून सुमारे २२ कोटी रुपये जमा झाले होते, असा दावा त्यांनी केला. मात्र देवगड तालुक्यातील अनेक सर्कलमधील शेतकऱ्यांना अपेक्षित विमा भरपाई मिळालेली नाही.
बापर्डे मिठबाव आणि शिरगाव आदी सर्कलमध्ये काही प्रमाणात मदत मिळाली असली, तरी देवगड व परिसरातील काही सर्कलमधील शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित असल्याचे ढोके यांनी सांगितले. आतापर्यंत अंदाजे २ कोटी ६५ ते ७० लाख रुपयांपर्यंतची रक्कम वितरित झाली असून उर्वरित सुमारे १८ ते १९ कोटी रुपयांचे काय झाले, याचा जाब कोण घेणार?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेतकरी अडचणीत असताना त्याला आर्थिक मदतीची गरज होती. मात्र विम्याची रक्कम वेळेवर मिळाली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून पात्र शेतकऱ्यांना त्यांची विमा भरपाई मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांच्यावरही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांचे आंदोलन झाले की ते विरोधकांचे आंदोलन असल्याचे सांगितले जाते. मात्र आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळत नसताना त्यासाठी किती वेळा आवाज उठवला, किती प्रयत्न केले आणि पंचायत समितीत याबाबत ठराव घेतला का, असा सवाल ढोके यांनी केला.
दरम्यान, पंचायत समिती सदस्यांना पेन्शन मिळावी या मागणीवरून सुरू असलेल्या चर्चेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या पेन्शनसाठी एकत्र येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ठोस भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या हितासाठी एखादा ठराव घेतला आहे का, जाहीरपणे सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ स्वतःच्या मागण्यांसाठी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींबाबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य जनता योग्य तो निर्णय घेईल, असा इशाराही ढोके यांनी दिला.
पालकमंत्री नितेश राणे यांनीही शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत सर्व सर्कलमधील पात्र शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी मिळावी, यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी योग्य ती भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम होऊ नये. सरकारने जाहीर केलेली मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून त्यांना गणेशोत्सवाच्या काळात दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी काका ढोके यांनी केली.यावेळी बागायतदार गणेश वाळके, अजय तेली यांच्यासह अन्य बागायतदार उपस्थित होते.