देवगड : आषाढी एकादशी निमित्त दीक्षित फाऊंडेशनकडून ऑनलाइन अभंग-भक्तिगीत गायन स्पर्धेचे आयोजन

शेअर करा

चार वयोगटांमध्ये स्पर्धा; आकर्षक रोख पारितोषिकांसह ३१ जुलैपर्यंत व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन

देवगड,दि.१८ जुलै

आषाढी एकादशी निमित्त दीक्षित फाऊंडेशनच्या वतीने ‘श्रीधर कृष्ण दीक्षित स्मृती ऑनलाइन अभंग-भक्तिगीत गायन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. विठ्ठलभक्तीचा वारसा जपत नवोदित गायक-गायिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सर्व वयोगटातील स्पर्धकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी विठ्ठलावर आधारित अभंग किंवा भक्तिगीताचे दोन मिनिटांचे व्हिडिओ सादरीकरण संबंधित गटाच्या समन्वयकांकडे व्हॉट्सअॅपद्वारे पाठवायचे आहे.

स्पर्धा चार वयोगटांत होणार असून १२ वर्षांपर्यंत, १२ ते २५ वर्षे, २५ ते ५० वर्षे आणि ५० वर्षांवरील अशा गटांमध्ये सहभागाची संधी उपलब्ध आहे.

प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांकाला २,१०० रुपये, द्वितीय क्रमांकाला १,५०० रुपये, तृतीय क्रमांकाला १,१०० रुपये, तसेच उत्तेजनार्थ ७५० रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे व्हिडिओ पाठविण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ असून, स्पर्धेचे नियम व अटी दीक्षित फाऊंडेशनच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर उपलब्ध आहेत. अधिकाधिक विठ्ठलभक्त, गायक-गायिका आणि संगीतप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी होऊन भक्तिरसाची परंपरा अधिक समृद्ध करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा