प्रभाग क्रमांक १ मधील विहिरी, लघुनळ योजना आणि पाणवठ्यांची पाहणी
देवगड,दि.०३ ऑक्टोंबर`
आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करता याव्यात, यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने प्रभागनिहाय पाणी स्रोतांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आज प्रभाग क्रमांक १ मधील कावलेवाडी, तरवाडी आणि पिरवाडी परिसरातील सार्वजनिक व खासगी विहिरी, लघुनळ योजना तसेच पाणवठ्यांची पाहणी करण्यात आली.
यावेळी संबंधित विहिरींची वॉटर लेव्हल तपासण्यात आली. तसेच पाणवठ्यांमधील उपलब्ध पाणी अडवून ते भविष्यात नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देता येईल का, याबाबत आवश्यक उपाययोजनांवर स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्यात आली. परिसरातील उपलब्ध जलस्रोतांचा योग्य पद्धतीने वापर करून संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीकडून नियोजन करण्यात येत आहे.
आजच्या पाहणीदरम्यान एकूण दहा विहिरी, चार लघुनळ योजना आणि दोन पाणवठ्यांची पाहणी करण्यात आली. याच पद्धतीने देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सर्व प्रभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून तेथील पाणी स्रोतांची वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे. उपलब्ध पाणीसाठा, जलस्रोतांची स्थिती आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पाहणीवेळी पाणीपुरवठा सभापती सौ. तन्वी चांदोस्कर, स्थानिक नगरसेविका सौ. स्वरा सुशील कावले, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष वैभव करगुटकर, राजू कावले, पाणीपुरवठा अधिकारी चारू पारकर, शमशुद्दीन हवालदार, प्रदीप लाड, संजय कावले, शहादत खान, नारायण दहिबावकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.