देवगड दीपगृहासमोरील समुद्रात तरंगताना मृतदेह सापडला; पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
देवगड,दि.३० सप्टेंबर
समुद्रात मासेमारी करताना फीट येऊन नौकेवरून पाण्यात पडून बेपत्ता झालेला खलाशी इसदर मथियास खेस (४०, मूळ रा. ओरिसा, सध्या रा. देवगड बंदर) याचा मृतदेह बुधवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास देवगड दीपगृहासमोरील समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड बंदरातील ओंकार यशवंत खांदारे यांच्या ’विश्वविनायक’ या नौकेवर इसदर खेस हा खलाशी म्हणून कामाला होता. त्याला फीट येण्याचा आजार होता. २६ सप्टेंबर रोजी तो नौकेवरून देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेला होता. दुपारच्या सुमारास कुणकेश्वरसमोरील समुद्रात मासेमारी करत असताना तो पाण्यात पडला. ही बाब नौकेवरील इतर खलाशांच्या लक्षात येताच काही खलाशांनी पाण्यात उडी मारून इसदर खेस याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. अखेर, बुधवारी सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह देवगड दीपगृहासमोरील समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. या घटनेची खबर त्याचा मेव्हुणा अमरीत किशोर घनवार (२२, मूळ रा. ओरिसा, सध्या रा. देवगड बंदर) याने देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत करीत आहेत.